coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 392; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 94 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 14:58 IST2020-04-15T14:58:07+5:302020-04-15T14:58:27+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे आता 94 रुग्ण झाले आहेत.

coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 392; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 94 रुग्ण
मनोहर कुंभेजकर
मुंबई- वांद्रे ते दहिसर पूर्व अशा विस्तीर्ण पसरलेल्या व सुमारे 65 लाख लोकवस्ती असलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते. पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. लोकमतला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे आता 94 रुग्ण झाले आहेत.
पश्चिम उपनगरात अजूनही नागरिक विनाकारण किराणा, भाजी व फळे विकत घेण्यासाठी बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. काल सकाळी बीकेसी येथील भाजी मंडईत सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत, मास्क परिधान न करता भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कसं घालायची हा पोलीस यंत्रणा व पालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम या भागांचा मिळून के पश्चिम वॉर्ड असून, येथे कोरोनाचे 77 रुग्ण झाले आहेत. पी दक्षिणमध्ये 35 व पी उत्तरमध्ये 62 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्डमधील आता कोरोनाचे 174 रुग्ण झाले आहेत. के पश्चिम हा सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिमपर्यंत पसरलेला मोठा वॉर्ड आहे. लिकेच्या नकाश्यावर हा कोरोनाचा हॉट स्पॉट असून येथे कोरोनाचे 13 रुग्ण बरे झाले असून आज येथे 77 रुग्ण आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे. एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाच्या 12 रुग्णांची वाढ झाली असून, रुग्णसंख्या 94वर गेली आहे.
मुंबईतील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला वॉर्ड म्हणून पी उत्तर वॉर्ड ओळखला जातो. मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरारपर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्डमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण वाढले असून एकूण 62 रुग्ण झाले आहेत. पालिकेच्या वॉर्ड विभागणीनुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात. पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 77 पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्या खालोखाल एच पूर्व मध्ये 94, पी उत्तरमध्ये 62, एच पश्चिममध्ये 34, के पूर्व मध्ये 50, आर दक्षिण मध्ये 38, पी दक्षिण मध्ये 35, आर मध्य मध्ये 21 व आर उत्तर मध्ये 15 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 392 रुग्ण झाले आहेत.
वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्यासह पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, परिमंडळ 4 चे पालिका उपायुक्त रणजित ढाकणे, परिमंडळ 3 चे उपायुक्त पराग मसूरकर, परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह 9 सहाय्यक पालिका आयुक्त, 9 वॉर्डचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र आपले 100 टक्के योगदान देऊन मोलाची भूमिका बजावत आहेत. तर मुंबई पोलिसांचे देखील मोलाचे सहकार्य पालिका प्रशासनाला मिळत असल्याचे येथील चित्र आहे.