Join us

Coronavirus: परवानगी मिळाली तरीही दुकानदारांचा गोंधळ; दुकानांचे शटर खालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 02:09 IST

एका लेनमधील पाच एकल दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी पाचहून अधिक दुकाने आहेत

मुंबई : अर्थव्यवस्थेला चालना मिळावी या उद्देशाने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक वस्तूंसोबतच अन्य एकल दुकाने सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र, नियमांबाबत असलेली संदिग्धता, बंद असलेली वाहतूक आणि कोरोनाची भीती यामुळे सोमवारी मुंबईतील बहुतांश दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवणेच पसंत केले. तुरळक अपवाद वगळता सर्वत्र पूर्वीचीच स्थिती बाजारपेठांत दिसून आली.

मुंबईतील रेड झोनचे दोन भाग करत सरकारने अत्यावश्यक वस्तूंसोबतच इलेक्ट्रॉनिक्स, कपडे अशी विविध प्रकारची एकल दुकाने उघडण्यास परवानगी दिली. दारूच्या दुकानांनाही यात परवानगी मिळाल्याने त्याचीच चर्चा जोरात झाली. राज्य शासनाकडून निर्देश जारी करण्यात आले तरी स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट दिशानिर्देश नव्हते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानदारांनी आज दुकाने बंदच ठेवली.

अगदीच तुरळक ठिकाणी काही कपड्यांची दुकाने विशेषत: अंतर्वस्त्रांची दुकाने काही काळासाठी उघडी होती. त्यातही पुढे दुकान आणि मागे घर अशी रचना असलेलीच दुकाने सोमवारी थोडा वेळ सुरू होती. दरम्यान, मुंबईतील तीन लाख दुकानदारांसमोर सध्या विविध अडचणी आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दुकानदारही धास्तावले असल्याचे रिटेलर असोसिएशन आॅफ इंडियाचे वीरेंद्र शहा यांनी सांगितले. शिवाय, स्थलांतरित मजूर, कामगार आपापल्या गावी जात असल्याने मनुष्यबळाची मोठी अडचण आहे.

शिवाय, दुकान मुंबईत आणि कामगार उपनगरात किंंवा थेट ठाणे, नवी मुंबई अथवा बोरीवलीच्या पुढे असा प्रकार आहे. हे कामगार मुंबईत पोहोचू शकत नाहीत. लोकल आणि बस सेवा बंद आहे. टॅक्सी-रिक्षांवरील बंदी अद्याप तशीच आहे. त्यामुळे एकल दुकाने सुरू ठेवण्यातही अडचणी आहेत. तसेच, नियमांबाबत वॉर्ड आॅफिसरकडून जोपर्यंत स्पष्ट सूचना येत नाहीत, तोपर्यंत दुकाने सुरू करणे शक्य नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.त्यानंतरच घेणार निर्णयएका लेनमधील पाच एकल दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी पाचहून अधिक दुकाने आहेत. त्यातली नेमकी कोणती पाच दुकाने चालू ठेवायची, हा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर होता. याबाबत वॉर्डस्तरावर अधिकाºयांशी चर्चा करूनच दुकाने उघडण्याचा पवित्रा व्यापारी मंडळांनी घेतला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस