Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Dharavi: धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 02:47 IST

या झोपडपट्टीत आतापर्यंत ७८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ५० नवीन रुग्ण सापडले असून २१ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.

मुंबई :धारावीसारख्या देशातील मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. मात्र येथील नागरिक मुंबई महापालिकेशी संपर्क साधत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांची मदत घेतली आहे. त्यानुसार अशा रुग्णांना विनंती करून क्वारंटाइन होण्याचे आवाहन केले जाणार आहे. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. तब्बल साडेआठ लाख लोकसंख्या असलेल्या या झोपडपट्टीमध्ये लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे संशयित रुग्ण शोधणे आणि त्यांना क्वारंटाइन करणे अवघड बनले आहे.

या झोपडपट्टीत आतापर्यंत ७८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ५० नवीन रुग्ण सापडले असून २१ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे वरळी, प्रभादेवीनंतर धारावी परिसर हॉटस्पॉट बनला आहे. केंद्रीय पथकाने गेल्या महिन्यात धारावीमध्ये पाहणी करून काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार जास्तीत जास्त चाचणी आणि क्वारंटाइन सुविधा वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी पालिकेचे काही कर्मचारी व्यक्त करीत आहेत. यामुळे आपल्या विभागातील नागरिकांमध्ये कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित धारावीमधील महापालिका शाळेत क्वारंटाइन होण्यास सांगावे, अशी विनंती पालिका प्रशासनाने लोक प्रतिनिधी, समाजसेवी संस्थांना केली आहे. पालिकेचे नऊ दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, साडेतीनशे खासगी डॉक्टरांमार्फत झालेले सर्वेक्षण आणि बाधित रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क गटातील नागरिक अशा स्वरूपात आठवड्यात २५ हजार लोकांची तपासणी झाली.नागरिकांमध्ये कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित धारावीमधील महापालिका शाळेत क्वारंटाइन होण्यास सांगावे. त्या ठिकाणी डॉक्टर्सची सोय असून, औषधोपचारही केले जातील. तसेच आवश्यकता असल्यास चाचणी केली जाईल व पुढील उपचार केले जातील. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस