CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:12 IST2020-06-19T02:44:27+5:302020-06-19T07:12:05+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना; लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर निर्जंतुकीकरणासाठी मारण्यात येतो फवारा

CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू झाली आहे. गर्दीमुळे लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत आहेत. मात्र लोकलची स्वच्छता करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. सॅनिटायजेशन करण्यात पश्चिम रेल्वेपेक्षामध्य रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासन लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर स्वच्छता कर्मचारी सॅनिटायजरची फवारणी लोकलवर करतात. तर, पश्चिम रेल्वे प्रशासन दिवसातून दोनदा लोकल सॅनिटायजेशन करते.
मध्य रेल्वे प्रशासन कोरोनाबाबत जनजागृतीसह स्वच्छता करण्यात आघाडीवर आहे. लोकल, श्रमिक विशेष ट्रेन यांची स्वच्छता करण्यासाठी जंतुनाशक औषधांचा वापर केला जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सीएसएमटी येथे उभी राहताच निर्जंतुकीकरणासाठी तिच्यावर सॅनिटायजर फवारले जाते. बाहेरून आणि आतून लोकलवर फवारा मारला जातो. त्यानंतर ही लोकल दुसºया फेरीसाठी वापरली जाते.
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सॅनिटाइज करण्यासाठी तीन कर्मचारी आहेत. यासह कारशेडमध्ये संपूर्णरित्या आतून-बाहेरून मशीनद्वारे लोकलची स्वच्छता केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल दिवसातून दोनदा सॅनिटाइज होते. सकाळच्या सत्रात धावणाºया लोकल दुपारनंतर सॅनिटायजरने स्वच्छ केल्या जातात. या लोकल कारशेडमध्ये रवाना केल्या जातात. दुपारच्या सत्रात दुसºया लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. या लोकलच्या सर्व फेºया संपल्यावर लोकल सॅनिटाइज केल्या जातात, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.
स्वच्छतेसाठी कटिबद्ध
लोकलच्या प्रत्येक फेरीनंतर आतून आणि बाहेरून डब्यांचे सॅनिटायजेशन केले जात आहे. कोरोनाच्या काळात कोरोना योद्धे, मध्य रेल्वे प्रशासन स्वच्छतेसाठी कटिबद्ध आहोत.
- पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण अशक्य
निर्जंतुकीकरणासाठी एका फेरीनंतर लोकल सॅनिटाइज करणे शक्य नाही. त्यामुळे दिवसातून दोनदा लोकल सॅनिटाइज केली जाते.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे