Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: निवृत्त होईपर्यंत मालवाहतुकीचे कर्तव्य पार पाडले; मध्य रेल्वेमधील विलास पगारे ठरले उत्तम योद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 02:10 IST

मालवाहतूक आणि पार्सल वाहतुकीचे कामकाज हे एक मोठे आव्हान आहे

मुंबई : लॉकडाउन काळात फक्त मालगाडी, पार्सल गाडीची सेवा सुरू आहे. याद्वारे जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केली जात आहे. मुलुंड कंटेनर टर्मिनल येथे मुख्य यार्ड मास्टर म्हणून विलास पगारे कर्तव्य पार पाडत होते. लॉकडाउन काळात त्यांनी निवृत्त होईपर्यंत महत्त्वपूर्ण कामे केली. त्यामुळे पगारे उत्तम योद्धा ठरले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

लॉकडाउन कालावधीत मुलुंड कंटेनर टर्मिनल येथे २३ मार्च ते २२ एप्रिल २०२० दरम्यान मालगाड्यांतील माल चढविणे, उतरवणे यासाठी ते स्वेच्छेने तेथेच थांबत होते. या काळात त्यांनी येथील टर्मिनलमध्ये ४० रॅकची हाताळणी केली. पगारे हे ३५ वर्षे मध्य रेल्वेत सेवा केल्यानंतर ३० एप्रिल २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेतील अगदी शेवटच्या टप्प्यातही त्यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी धावपळ केली. ते त्यांच्या कुटुंबापासून एक महिना दूर राहिले. त्यामुळे ते एक उत्तम योद्धा असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.कामाचा ताण होता दुप्पट१) मुलुंड कंटेनर टर्मिनल येथे जवाहरलाल पोर्ट टर्मिनलच्या आयात कंटेनर्सना बाहेर काढण्यासाठी विस्तारित गेट सुविधा आहे. एका महिन्यात ५६ तर दिवसाला सरासरी १.८६ रॅक हाताळले जातात. २०१९-२० मध्ये हाताळल्या गेलेल्या सरासरी गाड्यांच्या तुलनेत ३.८ पट वाढ झाली आहे. जवाहरलाल नेहरू बंदरातील द्रोणागिरी कंटेनर टर्मिनलने ४६ रॅक हाताळले. जे दररोज सरासरी १.५ रॅक होते. २०१९-२० मधील सरासरी गाड्यांच्या तुलनेत लॉकडाउन कालावधीत १.८ पट वाढ झाली.२) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या आॅपरेटिंग विभागाने जेएनपीटी ते विविध भागांतील भारतीय कंटेनर कॉर्पोरेशनच्या आयात कंटेनर्स हलविण्यासाठी ३१५ गाड्या हाताळल्या असून, मार्च २०२०च्या तुलनेत एप्रिल २०२०मध्ये लोडिंगमध्ये ७५ टक्के वाढ झाली आहे. एक इंटरचेंज पॉइंट म्हणून मुंबई विभागात लॉकडाउनच्या कालावधीत एका दिवसात सरासरी २१.२ मालगाड्या घेण्यात आल्या, तर २१.५ मालगाड्यांचा ताबा देण्यात आला. एप्रिल २०२० अखेरपर्यंत लॉकडाउन कालावधीत मुंबईकडे आणि मुंबईबाहेर १८५ पार्सल गाड्या चालविण्यात आल्या.३) मालवाहतूक आणि पार्सल वाहतुकीचे कामकाज हे एक मोठे आव्हान आहे. कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापकीय कौशल्याने अंमलात आणले. मुख्य यार्ड मास्टर्स / यार्ड मास्टर्स, स्थानक व्यवस्थापक, पॉइंट्समेन, पोर्टर, वाहतूक निरीक्षक, विभागीय दळणवळण नियंत्रक, नियंत्रक आणि मुंबई विभागातील नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत सर्व विभागांचे कर्मचारी योद्ध्यांनी कठीण काळात शांतपणे काम करीत राहून आणि मालवाहतूक तसेच पार्सल वाहतुकीची सुरळीत गती सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्या