Join us  

coronavirus: मोठ्ठा दिलासा, राज्यात आता वाढणार नाही कोरोना रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 2:37 PM

coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने ६० ते ६५ हजार रुग्ण सापडत आहेत. या आकडेवारीमुळे चिंता वाढत असली तरी आता राज्यातील जनतेला किंचीत दिलासादायक ठरेल अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने ६० ते ६५ हजार रुग्ण सापडत आहेत. या आकडेवारीमुळे चिंता वाढत असली तरी आता राज्यातील जनतेला किंचीत दिलासादायक ठरेल अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढीचा वेग स्थिरावल्याने साथीने उच्चांक गाठला असावा. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ही रुग्णवाढ स्थिरावून नंतर कमी होईल. (No more corona outbreaks in the Maharashtra, experts say's The exact reason) 

महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीने उच्चांक गाठल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमधील आकडेवारीमधून तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. 

तसेच महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा पिक आला आहे किंवा या शहरांमधील आकडेवारीची वाटचाल ही पिकच्या दिशेने होत आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी यावेळी दिली. दरम्यान, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही अपेक्षित रुग्णवाढ दिसून आली असून, ही वाढ अशीच होत राहिली तर पुढच्या आठवड्यात या राज्यांमध्ये कोरोनाचा उच्चांक गाठला जाऊन नंतर रुग्णसंख्या कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, देशामध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा उच्चांक २५ एप्रिलपर्यंत गाठला जाईल. त्यानंतर ही रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाजही अग्रवाल यांनी वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार पटींने वाढली. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दुपटीने वाढली. ही बाब महाराष्ट्रात कोरोनाचा पिक आला असल्याचे द्योतक आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्यमुंबई