Join us  

coronavirus: ‘बेस्ट’ प्रवासी अडीच लाखांवरून १५ लाखांवर, गर्दी टाळण्याचे प्रशासनासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:18 AM

३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे.

मुंबई : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असताना प्रवासासाठी मुंबईकरांकडे केवळ बेस्ट उपक्रमाची बसगाडी हेच वाहतुकीचे माध्यम उरले आहे. रेल्वे सेवा बंद असल्याने दररोज लाखो प्रवाशांची बसगाड्यांमध्ये गर्दी होत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या अडीच लाखांवरून १५ लाखांवर पोहोचली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे मोठे आव्हान ठरत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर २४ मार्चपासून लोकल सेवा बंद करण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी मोठा दिलासा दिला. मात्र ३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे.लॉकडाऊनपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र जून महिन्यात प्रवाशांची संख्या अडीच लाख एवढी होती. ३१ आॅगस्टपर्यंत मुंबईत दररोज तीन हजार चारशे बसगाड्या धावत असून दररोज सरासरी १५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. परंतु, बसफेºया कमी होत असल्याने कार्यालयात वेळेत जाण्यासाठी प्रवासी बसगाड्यांमध्ये गर्दी करूनप्रवास करीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बेस्टच्या सिंगल डेकर बसगाडीमधून २५ प्रवासी बसून, तर पाच जण उभ्याने प्रवास करू शकतात.तर मिनीबस गाड्यांमधून केवळ दहा प्रवासी बसून प्रवास करू शकतात. डबल डेकरमध्ये ४५ प्रवासी बसून आणि पाच प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात, असा नियम आहे.

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकमुंबईबेस्ट