Coronavirus: चिंता वाढली! मुंबईत गेल्या ४ महिन्याचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत ९६१ कोरोना रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 19:53 IST2022-06-05T19:53:17+5:302022-06-05T19:53:50+5:30
रविवारी मुंबईत ९६१ कोरोना रुग्ण आढळले त्यातील ९१७ रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसली नव्हती.

Coronavirus: चिंता वाढली! मुंबईत गेल्या ४ महिन्याचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत ९६१ कोरोना रुग्ण सापडले
मुंबई - शहरात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईत गेल्या ४ महिन्याचा रेकॉर्ड मोडत शहरात हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मागील २४ तासांत ९६१ रुग्ण सापडले आहेत. तर कोरोना महामारीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ३७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबईत सध्या सक्रीय रुग्णांची संख्या(Coronavirus) ४ हजार ८८० इतकी झाली आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईत ७०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे राज्यातील ज्या क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय अशाठिकाणी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मुंबई महापालिकेने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे की, रविवारी मुंबईत ९६१ कोरोना रुग्ण आढळले त्यातील ९१७ रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसली नव्हती. ९५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. तर ४४ रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यातील ४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत शनिवारी एकूण ८ हजार ७७८ कोरोना चाचणी केल्या होत्या. त्यासोबत एकूण चाचणी १ कोटी ७१ लाख ८३ हजार ९५१ इतकी झाली आहे.
#COVID19 | 961 new cases, 374 recoveries, and 1 death reported in Mumbai today.
— ANI (@ANI) June 5, 2022
Active cases at 4,880 pic.twitter.com/jQ6RIxXVkO
शनिवारी ८८९ रुग्ण आढळले
शनिवारी मुंबईत कोरोनाचे ८८९ रुग्ण आढळले. यामध्ये ८४४ म्हणजेच ९५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले होते. केवळ ४५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सजीव कुमार यांनी सांगितले होते की, मुंबईतील रुग्णालयांमध्ये केवळ १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी २४ हजार ४७१ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ १५४ खाटांवर म्हणजेच एकूण खाटांच्या ०.६३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लसीकरण आणि बूस्टर डोसवर भर
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार म्हणाले की, कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत १ जून ते ३१ जुलै या कालावधीत 'हर घर दस्तक' मोहीम राबविण्यात येत आहे. BMC १२ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करेल. यासोबतच वृद्धाश्रम आणि इतर ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षे आणि त्यावरील) बूस्टर डोस दिला जाईल. या मोहिमेत बीएमसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत.