मुंबई- आज राज्यात ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई येथील असून, १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे. आज राज्यात ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबई येथील आहेत. राज्यात ५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर ६७ नवीन रुग्ण आज समोर आले असून, ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा २९ मार्च २०२० रोजी येथील एका खासगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वडयात अमेरिकेहून आला होता, पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता. बदलापूर ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खासगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. तिचा कोणत्याही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता. जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगावमधील कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब होता आणि १ महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही प्रदेश प्रवास केलेला नव्हता. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षांच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६ झाली आहे.
CoronaVirus: आनंदवार्ता! राज्यात ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९०वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 21:26 IST