Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मुंबईत २७२४ कोरोना रुग्ण; बळींचा आकडा १३२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 22:02 IST

CoronaVirus : रविवारी नोंद झालेल्या सहा मृत्यूंपैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे.

मुंबई – शहर उपनगरात रविवारी १३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २ हजार ७२४ वर पोहोचली आहे. याखेरीज, रविवारी सहा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळी १३२ झाले आहेत. सहा मृत्यूंमध्ये एक मृत्यू रविवारी झाला असून अन्य मृत्यू अनुक्रमे १८ एप्रिल रोजी चार, १७ रोजी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

रविवारी नोंद झालेल्या सहा मृत्यूंपैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी पाच महिला होत्या, तर एका पुरुषाचा समावेश आहे. सहापैकी पाच रुग्ण ५० ते ६५ वयोगटातील असून एका महिला रुग्णाचे वय २६ आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांत रविवारी एकूण ३०३ संशयित रुग्ण दाखल झाले. तर रविवारी २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ४१३ कोरोना संशयित रुग्ण पालिका रुग्णालयांमध्ये दाखल झाले असून आजमितीस ३१० जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जसलोकमध्येही आणखी परिचारिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या परिचारिकांमध्ये पॉझिटिव्ह असून लक्षणे आढळली नाही आहेत, असेही रुग्णालय प्रशासनाने नमूद केले आहे. तर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी कऱण्यात आली असून अहवाल प्रलंबित असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस