Join us  

Coronavirus: राज्यात २४,८१८ लोक क्वारंटाइनमध्ये- राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:56 AM

राज्यात १६ सरकारी आणि १० खाजगी लॅब सुरू झाल्या असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने आपण सध्या वापरत नाहीत.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २४,८१८ लोक क्वारंटाइनमध्येस, तर १८२८ लोक आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर्स यांना एक जास्तीची पगारवाढ देण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत असल्याचेही ते म्हणाले. लोकमत फेसबुकच्या माध्यमातून बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्यात १६ सरकारी आणि १० खाजगी लॅब सुरू झाल्या असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने आपण सध्या वापरत नाहीत, कारण तेवढे पेशंटही येत नाहीत, त्यामुळे तपासण्या होत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. खासगी लॅबमधून आलेले रिपोर्ट आपण पुन्हा का तपासता असे विचारले असता टोपे म्हणाले, खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह आलेले रिपोर्ट आमच्याकडे निगेटिव्ह आले किंवा निगेटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ज्या लॅबना आम्ही परवानगी दिली आहे त्यांची सिस्टीम लागेपर्यंत पुन्हा तपासण्या केल्या जातील.

मुंबईत मेट्रो पॉलीश लॅबला काम थांबवण्याचे आदेश दिले का? असे विचारले असता टोपे म्हणाले, लॅब बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत, पण त्यांच्याकडे जेवढे तपासणीचे कीट आहेत तेवढेच सॅम्पल त्यांनी घ्यावेत. त्यापेक्षा जास्त घेऊ नयेत. घेतल्यास मात्र कारवाई केली जाईल, असेही त्यांना लेखी कळवण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती आयसोलेशमध्ये?

मुंबई ५४९, पुणे १२०, नागपूर ८४, ठाणे ५९, रायगड ३२, अहमदनगर १५२, नाशिक ३८, धुळे १४, औरंगाबाद २८, जालना ११, परभणी १७, अकोला १०, अमरावती १२, कोल्हापूर २९, सिंधुदुर्ग १३, सांगली ३०, रत्नागिरी २७, बुलडाणा ८, जळगाव ७, उस्मानाबाद व भंडारा प्रत्येकी ५, यवतमाळ व लातूर प्रत्येकी ४, सोलापूर, पालघर प्रत्येकी ३, नंदुरबार, बीड, गोंदिया, गडचिरोली, प्रत्येकी २

सैफी हॉस्पिटल बंद ठेवले, डॉक्टरांवर कारवाई करू

एक डॉक्टर लंडनहून आले, त्यांना सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला दिला होता, पण तो न पाळता त्यांनी रुग्णांची तपासणी केली. आॅपरेशनही केल्याची माहिती आहे. त्यामुळे आज अडचणीच्या काळात सैफी हॉस्पिटल बंद ठेवण्याची वेळ आली आहे, आता ते हॉस्पिटल कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरायचे का, यावर विचार चालू असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्रराजेश टोपे