CoronaVirus 13,000 active corona patients in Mumbai are asymptomatic | CoronaVirus News: मुंबईतील कोरोनाचे १३ हजार सक्रिय रुग्ण लक्षणविरहित

CoronaVirus News: मुंबईतील कोरोनाचे १३ हजार सक्रिय रुग्ण लक्षणविरहित

मुंबई : कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ८६ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही आता कमी झाली असून, सध्या १९ हजार १३२ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र यापैकी १३ हजार २९६ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे दिसून येत आहे. तर आतापर्यंत ९६ हजार कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत आतापर्यंत एक लाख २३ हजार रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यापैकी ७८ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर सरासरी ०.८९ टक्के असल्याने गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यापैकी सध्या १९ हजार ९३२ रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार सुरू आहेत. तर पाच हजार ५१८ रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असली तरी त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील म्हणजेच हाय रिस्क कॉण्टॅक्ट शोधण्यास पालिका प्रशासनाने प्राधान्य दिले. त्यांचे तत्काळ आवश्यकतेनुसार विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याने ९ आॅगस्ट रोजी मागील २४ तासांत तब्बल १५ हजार ३८ जोखमीचे कॉण्टॅक्ट शोधण्यात आले. यामध्ये सहा हजार २१३ जणांना लागण होण्याचा जास्त धोका होता. तर आठ हजार ८२५ कमी धोका होता. अशांवर आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

दीर्घ आजार, ज्येष्ठ नागरिक अशा सुमारे १११८ रुग्णांच्या प्रकृतीची अधिक काळजी घेण्याचे पालिकेने ठरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईत सहा हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५८२ बाधित क्षेत्रात नऊ लाख ५९ हजार ५६१ निवास, ४० लाख ३७ हजार ६० लोकसंख्या असून, या भागात आतापर्यंत ३० हजार ५४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रतिबंधित केलेल्या ५३९६ इमारतींमध्ये दोन लाख २३ हजार ७६२ निवास, आठ लाख २२ हजार १३५ लोकसंख्या आहे. या भागात आतापर्यंत २१ हजार ४८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus 13,000 active corona patients in Mumbai are asymptomatic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.