Join us

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात आज १२० नवीन रुग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू; एकूण ८६८ कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 21:56 IST

आज  झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.

मुंबईः कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. आज राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८  झाली आहे. आज राज्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज  झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. राज्यातील ६६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीसुद्धा परतले आहेत.  बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ४१ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता, शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणा-या ८० वर्षीय पुरुषाचाही काल मृत्यू झाला होता. नवी मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते. मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका ९ महिन्याच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे)  मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला. मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी संध्याकाळी एका ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. महानगरपालिकेच्या बांद्रा येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेशमध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता. 

राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२वर

राज्यात कालपर्यंत झालेल्या ४५ मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढील महत्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण (७३ %) एवढे आहे. ४५ वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, साधारणपणे म्हणजे ६०% मृत्यू हे ६१ वर्षावरील व्यक्तींचे आहेत. कालपर्यंत झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी साधारणतः ७८ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते. ६० वर्षांवरील आणि मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७५६३ नमुन्यांपैकी १५,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२,५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई  परिसरातील इअतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ७१ तर बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस