Join us

Coronavirus : राज्यातील सव्वा लाख ट्रक अकरा दिवस वाहतुकीसाठी बंद, वाहतूक संघटनांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 04:31 IST

Coronavirus : जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरी थांबण्याचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी आवाहन केले.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सव्वा लाख ट्रक वाहतुकीसाठी अकरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या ट्रक चालकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, २० मार्च ते ३१ मार्च दरम्यान ट्रक रस्त्यावर धावणार नाहीत. या कालावधीत २०० कोटींहून अधिक नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरी थांबण्याचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी आवाहन केले. वाहतूक व्यवसायामध्येही खूपच गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, कन्टेनरमध्ये माल भरताना किंवा एखाद्या ठिकाणी माल खाली करताना चालकांचा अनेकांशी संपर्क येतो. कंपनीच्या गेटवर रांगेत अंतर न ठेवता उभे राहावे लागते, तसेच ट्रक चालकांना १६ ते १८ तास गाडी चालवावी लागते, त्यामुळे जिथे मिळेल तिथे जेवण करावे लागते. यातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे ट्रक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक संघटनांनी घेतला आहे. त्यानुसार, २० मार्च ते ३१ मार्च दरम्यान सर्व गाड्या बंद राहतील.हप्तेवसुली थांबविण्याची विनंतीअनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ट्रक घेतले आहेत. कोरोनामुळे काही दिवस ट्रक वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे. साहजिकच, ट्रक मालकांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण होईल. त्यामुळे वाहतूक संघटनेतर्फे सर्व बँकांना आणि अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन कोरोनाचे सावट कमी होत नाही, तोपर्यंत हप्त्यांची वसुली थांबवावी, अशी विनंती करणार आहोत, असे राजेंद्र वनवे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस