Join us

coronavirus: १०८ रुग्णवाहिकेने राज्यातील ३० हजार कोरोनाबाधितांना दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 03:18 IST

राज्यात १०८ ही रुग्णवाहिका वरदान ठरत आहे. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत राज्यातील ३० हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त तसेच संशयित रुग्णांना २४ तास सेवा दिली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यात १०८ ही रुग्णवाहिका वरदान ठरत असून, कोरोनाचा राज्यभर संसर्ग वाढल्याने या रुग्णवाहिकेचा कोरोनाबाधित व संशयित रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.या रुग्णवाहिकेने आतापर्यंत राज्यातील ३० हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त तसेच संशयित रुग्णांना २४ तास सेवा दिली आहे. १२ मेपर्यंत राज्यातील ३३ हजार ९०५  कोरोनाबाधित संशयित रुग्णांना सेवा दिली असून यामध्ये मुंबईतील संशयित कोरोनाबाधितांची संख्या १२ हजाराहून अधिक असल्याची माहिती  बीव्हीजीच्या ‘ईएमएस’चे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.महत्त्वाचे म्हणजे या दरम्यान त्यांच्या मुंबईतील ३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तरीही १०८ची सेवा ही अविरत सुरु ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.संपूर्ण राज्यात २०१४पासून बीव्हीजी इंडिया ग्रुपच्या पुढाकारातून आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सहयोगाने  महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसअंतर्गत सर्वांसाठी मोफत १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. आजमितीला राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. २३३ रुग्णवाहिका या सर्व आधुनिक लाइफ सपोर्ट तंत्रज्ञानाने सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत, तर  ७०४ रुग्णवाहिका या सामान्य सुविधांसह कार्यरत आहेत. यासाठी ५००० हजाराहून अधिक तज्ज्ञ (डॉक्टर्स, ड्रायव्हर्स, मॅनेजर्स ) कार्यरत असून आठ वर्षांत या रुग्णवाहिकेने राज्यातील ४८  लाख रुग्णांना वाहतूक करून अनेकांना जीवदान दिले आहे.कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णवाहिका सॅनिटाइज करून पुन्हा रस्त्यावर आणेपर्यंत किंवा इतर कोणताही धोका इतर रुग्णांना होऊ नये म्हणून रुग्णवाहिकांचे असे विभाजन करण्यात आल्याची माहिती डॉ. शेळके यांनी दिली. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेच्या चालक व डॉक्टरांना फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण प्रक्रियेवर तसेच कोरोना संशयित किंवा निदान झालेल्या रुग्णांची सेवा करताना घ्यावयाच्या मानक खबरदारीविषयी प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.  हे काम करताना आमचे मुंबईतील ३५ कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या संकटामुळे जराही विचलित न होता आमच्या मुंबईतील टीमने डायल १०८ सेवेचे काम अथकपणे सुरूच ठेवले आहे, असे डॉ. शेळके यांनी अभिमानाने सांगितले.  कोरोना संशयितांची काही जिल्हानिहाय १०८ रुग्णवाहिकेची वाहतूक (१२ मेपर्यंत ) मुंबई - १२,५९३  पुणे - ३,०७६ नागपूर- १,९११ कोल्हापूर - ३,१८९ अहमदनगर - १,५४३

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई