Join us

CoronaVaccine: पुरेसा साठा नसल्याने लसीकरण अडचणीत; ४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 07:20 IST

४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद; ३३ केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी मर्यादित साठा

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णायक टप्पा दिनांक १ मेपासून सुरू होत असताना मर्यादित साठा उपलब्ध असल्याने ही मोहीमच अडचणीत आली आहे. लसींचा साठा संपुष्टात आल्याने गुरुवारी ४० खासगी केंद्रांवर लसीकरण होणार नाही तर उर्वरित ३३ केंद्रांवरही दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य व साठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे. लसींचा साठा उपलब्ध झाल्यास सरकारी आणि पालिका केंद्रांवर गुरुवारी उशिरा लस देण्यात येईल.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत सुमारे २४ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या सरकारी व महापालिकेची ६३ तर खासगी रुग्णालयांत ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्र सुरू आहेत. मात्र, लसीचा साठा महापालिकेला मर्यादित स्वरूपात मिळत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण बंद करावे लागत आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने उपलब्ध साठ्यातून लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

मध्यरात्री साठा येण्याची शक्यता

पालिकेला प्रत्येक आठवड्याला किमान दहा लाख लस मिळणे अपेक्षित आहे. जेमतेम दोन ते तीन लाख लसींचा साठा मिळत असल्याने प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री काही प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका