Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 09:08 IST

CoronaVaccine: महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे

मुंबई : राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर  मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी दि. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत एकूण २ कोटी ८० लाख जणांना लस

राज्यात आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ८० लाख ८२ हजार ९९९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १८ ते ४४  वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू झाल्याने लसीकरणाला गती मिळेल, असा विश्वास आहे. आतापर्यंत या वयोगटातील ३४ लाख १७ हजार ५३६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ लाख ३२ हजार ७३१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

राज्यात १२ लाख ४८ हजार ६४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख १५ हजार ६६० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ६३ हजार ५१९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर, ८ लाख ६६ हजार ९२४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५८ लाख १९ हजार १५३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३६ लाख १८ हजार ८३२ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस