Join us  

१०० टक्के उपस्थितीच्या सक्तीमुळे टपाल कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी, कोरोनाची धास्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 7:49 PM

अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या लोकल सेवेमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे.

 

खलील गिरकर

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनची अनलॉक प्रक्रिया एकीकडे सुरु झाल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे लॉकडाऊनची मुदत वाढवली जात आहे. अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या लोकल सेवेमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. मात्र अद्याप मुंबई महानगर विभागातील कोरोनाचा प्रसार कमी झालेला नसल्याने टपाल कर्मचारी व अधिकारी आपला जीव धोक्यात टाकण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. टपाल कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले असल्याने कार्यालयात हजर राहणे त्यांना अनिवार्य आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुऴे अद्याप टपाल कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यालयात येत नसल्याचे चित्र आहे. 

मुंबईतील प्रवासासाठी टपाल कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे मात्र लोकल प्रवासात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे आजारपण,  रजा व इतर मार्गांचा अवलंब करुन कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळण्याकडे बहुतांशी कर्मचाऱ्यांना कल आहे.  टपाल कार्यालयाची जागा मर्यादित असल्याने व या मर्यादित जागेत पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामावर अनुपस्थित राहण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. जीपीओ मधील टपाल खात्याच्या विविध कार्यालयात सुमारे एक हजार पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतात. जीपीओ मध्ये सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी इतर छोट्या टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टपाल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन 15 टक्के कर्मचाऱ्यांना रोस्टरप्रमाणे बोलवावे अशी संघटनांची मागणी आहे. याबाबत मार्ग काढण्यासाठी दोन कामगार संघटनांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल(सीपीएमजी)  हरीश अग्रवाल यांना पत्र दिले होते. त्यानंतर सीपीएमजीच्या निर्देशानंतर याबाबत बैठक देखील पार पडली होती. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. 

 

टपाल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्यात आली असून मास्क, सँनिटायझर पुरवण्यात आले आहे.  लॉकडाऊनमध्ये टपाल कार्यालयाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र व गोवा मध्ये सुमारे 96 टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत.

- हरीश अग्रवाल,  मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस