Join us

कोरोनाचा फटका; केवळ ३० टक्केच निधी योजनांवर झाला खर्च; एकूण बजेटच्या ४५ टक्केच खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:49 IST

वर्ष संपायला एक महिना बाकी; एकूण बजेटच्या ४५ टक्केच खर्च

अतुल कुलकर्णीमुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाला कोरोनामुळे मोठा फटका बसला असून एकूण बजेटच्या फक्त ४५.५० टक्के खर्च झाला असून त्यातही विविध योजनांवर फक्त ३० टक्के खर्च झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे फक्त ०.८०३ टक्के खर्च शिवसेना युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याचा झाला आहे. त्या पाठोपाठ अवघे १.०५४ टक्के खर्च राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खात्याचा झाला आहे.

राज्यात कोरोनामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून गेली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ४ लाख ८० हजार ८६०.४४९ कोटींचा होता. आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना बाकी असताना आजपर्यंत २ लाख ४० हजार ३०४.६७ कोटी रुपये विविध विभागांना देण्यात आले. त्यापैकी शासनाच्या विविध योजनांवर फक्त ७८,०२७.४९ कोटी रुपयेच मिळाले आहेत. त्यामुळे हे वर्ष विना योजना, विना पैशांचे गेले आहे, असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

१२ विभागांचा खर्च  ५० टक्क्यांपेक्षा जास्त 

३२ विभागांपैकी १२ विभागांचा खर्च ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे, बाकी २० विभाग ५० टक्क्यांच्या आतच गुंडाळले गेले आहेत. कोरोनामुळे आरोग्यावर खर्च जास्त होणे अपेक्षित असताना वैद्यकीय शिक्षण (५८.२४%)  व सार्वजनिक आरोग्य (६२.२७%) विभागाचा खर्च झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने यात (७५.१४%) खर्च करुन बाजी मारली असली तरी त्यातला जास्तीत जास्त खर्च आस्थापनेवरचा आहे.

बऱ्याच योजनांची कामेच सुरू करता आली नाहीत. सरकारकडे विविध करापोटी येणारा पैशांचा ओघ देखील थंड झाला आणि अनिवार्य खर्च थांबवू शकत नव्हतो. म्हणून ४५ टक्के तरी खर्च दिसत आहे. अन्यथा तो देखील झाला नसता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्र सरकारकोरोना वायरस बातम्या