Corona Virus: मुंबई, पुणे, नागपूरसह ५ शहरांतील चित्रपटगृहे, व्यायामशाळा आजपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 03:00 AM2020-03-14T03:00:12+5:302020-03-14T03:01:44+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा; नाट्यगृहे, जलतरण तलावांचाही समावेश

Corona Virus: Theaters, gymnasiums closed in 5 cities including Mumbai, Pune, Nagpur | Corona Virus: मुंबई, पुणे, नागपूरसह ५ शहरांतील चित्रपटगृहे, व्यायामशाळा आजपासून बंद

Corona Virus: मुंबई, पुणे, नागपूरसह ५ शहरांतील चित्रपटगृहे, व्यायामशाळा आजपासून बंद

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदी शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

सद्यपरिस्थितीत राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा सुरू राहणार असून शाळा आणि विद्यापीठ स्तरावरील परीक्षांबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुणे, पिंपरी-चिंचवड येथील रुग्णांची संख्या जास्त असल्याने या दोन शहरांतील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय खासगी कंपन्यांना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरून काम करण्याची मुभा द्यावी, असे आदेशही जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत, मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

महापडझडीच्या थरारानंतर बाजार सावरला
1) पहिल्या १५ मिनिटांत विक्रमी १० टक्क्यांपेक्षा जास्त पडझड, त्यानंतर लागलेले ‘लोअर सर्किट’ आणि सर्किट उठताच कमी किमतीतील समभाग खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड, असा नाट्यमय थरार शुक्रवारी शेअर बाजारांत पाहायला मिळाला. सुरुवातीला ३,२०० पेक्षा जास्त अंकांनी घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्राअखेरीस १,३२५.३४ अंकांच्या वाढीसह बंद झाला.
2) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळच्या सत्रातील विक्रमी घसरण भरून काढून ९,९०० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बँकिंग, वित्त, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांतील तेजीने बाजाराला सावरले.
3) सकाळी अवघ्या १५ मिनिटांत ही मोठी पडझड झाल्यामुळे बाजारात ‘लोअर सर्किट’ लागले. त्यामुळे ४५ मिनिटे व्यवहार बंद राहिले.

सोने-चांदीतही घसरण
जळगाव : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होऊन बाजारात घसरणीसह सोने-चांदीतही मोठी घसरण झाली. औद्योगिक आयात-निर्यात थांबून दोन दिवसांत सोने २२०० रुपये प्रति तोळा तर चांदी २५०० रुपये प्रति किलोने घसरली. गुरुवारी सोन्याचे भाव आठशे रुपयांनी कमी झाले होते.

राज्यात २० रुग्ण
पुणे/नागपूर : राज्यात नागपूर येथे तीन आणि पुणे, अहमदनगर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २० झाली आहे. अमेरिकेहून पुण्यात आलेला आणखी एक तरुण पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

संसर्गजन्य आजार टाळण्याचा कायदा लागू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून केली. हॉटेल, उपाहारगृहे, मॉल्स बंद करण्यात येणार नाही. त्याचबरोबर रेल्वे, बससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाही.

मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्स केंद्राकडून आवश्यक वस्तू घोषित
कोरोनाच्या धास्तीने मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला असून काळाबाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एन-९५ सह मास्क (मुखपट) आणि हात स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक द्रव्य (हॅण्ड सॅनिटायझर्स) आवश्यक वस्तू म्हणून घोषित केले आहे. या वस्तूू जूनअखेरपर्यंत आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत असतील. साठेबाज आणि काळाबाजार करण्यांवर बडगा उगारत वाजवी किमतीत मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्स उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आवश्यक वस्तू अधिनियमातहत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दुहेरी आणि तिहेरी अस्तराचे आणि एन-९५ मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्स ३० जून २०२० पर्यंत आवश्यक वस्तू म्हणून ूघोषित केल्या आहेत. या निर्णयातहत केंद्र आणि राज्यांना मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्सचे उत्पादन, गुणावत्ता आणि वितरणासंबंधी नियमन करता येईल. तसेच या वस्तू वाजवी किमतीत बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचाही अधिकार असेल.

Web Title: Corona Virus: Theaters, gymnasiums closed in 5 cities including Mumbai, Pune, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.