Corona virus now notified, health department information | कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती

कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : कोविड-१९ (कोरोना) विषाणूच्या जगभर झालेल्या उद्रेकानंतर आता देशभरातही या विषाणूचे २८ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानांतील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले आहे. याशिवाय, जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना आजाराचा समावेश आता ‘नोटिफाइड’ आजारांच्या यादीत करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टिकोनातून लवकरच राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य १९६९ नियमनानुसार, संसर्गजन्य आजाराचा उद्रेक खासगी रुग्णालयांमध्ये झाल्यास त्याविषयी स्थानिक आरोग्य यंत्रणांना कळविणे गरजेचे असते. मात्र कोरोना विषाणूचे निदान सध्या सर्व शासकीय व पालिका प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत असल्याने याचा समावेश ‘नोटिफाइड’ आजारांमध्ये करण्यात आला आहे.
>आजारावर नियंत्रणासाठी अत्यावश्यक पाऊल
कोरोनाचा नोटिफाइड आजारांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कारण सध्या राज्यभरात कोरोनाचे निदान केवळ शासकीय यंत्रणांंमध्येच होते आहे. ज्या परिस्थितीत एखादा आजार उद्भवतो आणि त्याचे निदान खासगी आरोग्य यंत्रणांमध्ये करण्यात येते, त्या वेळेस राज्याच्या आरोग्य विभागाला त्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा उच्चाटनाच्या दृष्टिकोनातून ‘नोटिफाइड’ करावे लागते. परंतु, सध्या कोरोनासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने कोरोनाचा नोटिफाइड आजारांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील प्रमुख खासगी रुग्णालयांशी विलगीकरण कक्ष तयार करण्यासंबंधी चर्चा सुरू असून, लवकरच याविषयी कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, राज्य आरोग्य विभाग
गेल्या काही वर्षांत देशभरात संसर्गजन्य आणि अचानक उद्रेक झालेल्या आजारांचा आरोग्य विभागाकडून नोटिफाइड आजारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात प्लेग, पोलिओ, एचआयव्ही, डेंग्यू, मलेरिया, हेपेटायटिस, रेबिज, धनुर्वात, कांजण्या, अ‍ॅनिमिया, कुपोषण, कॉलरा, क्षयरोग, कुष्ठरोग, टायफॉइड अशा काही आजारांचा समावेश आहे.
हे आजार नोटिफाइड यादीत समाविष्ट झाल्यानंतर या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कृती आराखडा आखण्यात येतो. शिवाय, याविषयी स्थानिक यंत्रणांपासून ते राज्य, राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य यंत्रणा अत्यंत सतर्क राहून याविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना करते.

Web Title: Corona virus now notified, health department information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.