Corona Virus: कोरोनाचा फटका आंबा निर्यातीवर; कोकणातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:35 IST2020-03-13T04:05:27+5:302020-03-13T06:35:57+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सद्यस्थितीमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यामधून प्रतिदिन ४ हजार पेट्यांची हापूसची आवक होवू लागली आहे

Corona Virus: कोरोनाचा फटका आंबा निर्यातीवर; कोकणातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
नवी मुंबई : कोरोनाचा फटका हापूस आंब्याच्या निर्यातीलाही बसला आहे. आखाती देशात हवाई मार्गाने होणारी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सद्यस्थितीमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यामधून प्रतिदिन ४ हजार पेट्यांची हापूसची आवक होवू लागली आहे. मुंबईमधून आखाती देशांसह जगभर प्रतिदिन ३००ते ४०० पेट्यांची निर्यातही सुरू झाली होती. परंतु कोरोनाची साथ देशातही पसरू लागल्यामुळे हवाई मार्गाने होणारी निर्यात बंद झाली आहे. कुवेत, कतारसह इतर देशांमध्ये हवाई मार्गाने आंबा पाठविता येत नसल्याने त्याची बाजार समितीमध्येच विक्री करावी लागत आहे.
आंबा हंगामाच्या सुरवातीलाच कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होवू लागले आहे. यावर्षी आंबा निर्यात घटण्याची शक्यता आहे. निर्यात कमी झाल्यास देशांतर्गत भाव कोसळण्याचीही शक्यता आहे. गतवर्षी ४६ हजार ५१० टन आंबा निर्यात होवून ४०६ कोटी रूपयांची उलाढाल झाली होती.