CoronaVirus: वरळी, प्रभादेवीत ५०० जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:11 IST2020-04-24T02:05:08+5:302020-04-24T07:11:20+5:30
कुर्ल्यात २६७ बाधित; सायन, माटुंगा, अंधेरीतही रूग्ण संख्येत वाढ

CoronaVirus: वरळी, प्रभादेवीत ५०० जणांना कोरोनाची लागण
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या वरळी, प्रभादेवी विभागात बाधित रुग्णांचा एकूण आकडा पाचशेच्या पार गेला आहे. आरोग्य शिबिर आणि बाधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी, संशयितांचे क्वारंटाईन या उपक्रमांनंतर येथील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. 
महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या जी दक्षिण विभागात बुधवारपर्यंत ५०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल या परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या विभागाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक व आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील माहीम, धारावी, दादर येथे रुग्ण संख्या वाढत असल्याचे वाटत असताना बुधवारी तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण कुर्ला परिसरात आढळून येऊ लागले आहेत. कुर्ला परिसरात २६७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी जी उत्तर विभाग (धारावी, दादर) तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र एका दिवसात कुर्ला, अंधेरी पश्चिम, सायन, माटुंगा या विभागात बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
सर्वाधिक रुग्ण असलेले विभाग
विभाग                  ठिकाण            रुग्ण    डिस्चार्ज
जी-दक्षिण       वरळी, प्रभादेवी     ५०७        ७२
ई-भायखळा       मुंबई सेंट्रल         ३६८        ३१
एल                         कुर्ला              २६७       ०९
के-पश्चिम       अंधेरी, विले पार्ले     २६४        ३२
एफ-उत्तर        सायन, माटुंगा       २६०        १६
जी-उत्तर           धारावी, दादर      २५७        २०
सर्वात कमी रुग्ण असलेले विभाग
विभाग               ठिकाणं             रुग्ण      डिस्चार्ज
आर                   दहिसर              २२           ०६
टी                       मुलुंड                २६          ०५
सी                  चिरा बाजार,          २८           ०३
                      काळबादेवी
आर-मध्य         बोरिवली              ३६           १०
80% सर्वाधिक प्रमाण वरळी परिसरात सापडलेल्या कोरोना बाधित रूग्णांचे वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर येथे आढळून आले आहेत.
जी दक्षिण, इ विभाग बाधित अधिक
येथील ३८०० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरळी कोळीवाडा हे मुंबईतील पाहिले बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. येथील ८० हजार लोकांची तपासणी करण्यात आली होती.
मुंबईत ८१३ परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी १२४ बाधित क्षेत्र एकट्या जी दक्षिण विभागात आहेत. त्या खालोखा ई विभागात ६१ ठिकाणं बाधित आहेत.
मुंबई सेंट्रल, नागपाडा बाधित
भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल या परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या विभागाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक व आमदार रईस शेख यांनी केली आहे़