Join us  

Coronavirus Vaccination : मुंबईत उद्यापासून पुन्हा कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 10:07 PM

Coronavirus Vaccination : कोरोनाचे संकट संपवण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देमंगळवारपासून पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे. महापालिकेच्या ९ केंद्रावरील ४० बुथवर दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

मुंबई : कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. शनिवारी महापालिकेने केवळ १९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली होती. मात्र यापुढे दररोज चार हजार जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आठवड्यातून चारवेळा स. ९ ते सायं. ५ या वेळात लसीकरण केले जाणार आहे.

मार्च २०२० पासून मुंबईकर कोरोनाचा सामना करीत आहेत. कोरोनाचे संकट संपवण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. मात्र, लाभार्थींच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना संदेश गेलेच नाहीत. त्यामुळे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांसाठी ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.

अखेर यात सुधारणा झाल्याने मंगळवारपासून पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे. महापालिकेच्या ९ केंद्रावरील ४० बुथवर दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५०० लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. कोविन अॅपवरून लाभार्थ्यांना मोबाईलवर संदेश जाणार असले तरी पालिकेकडूनही लाभार्थ्यांना संदेश पाठवले जाणार आहेत. लसीकरण स. ९ ते दुपारी २ आणि दु. २ ते रात्री ९ पर्यंत केले जाणार होते. मात्र, आता स. ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच लसीकरण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

असा झाला होता तांत्रिक बिघाड...लसीकरणाच्या दिवशी ज्या लाभार्थ्यांना लस द्यायची होती. त्यांना एक दिवस आधी एसएमएस पाठवले जाणार होते. मात्र, कोविन ॲपवरून संदेश पोहोचलेच नाही. आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यावर रात्रभर जागून अधिकाऱ्यांनी एसएमएस पाठविले. तसेच फोन करून लाभार्थ्यांना लसीकरणाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. लस घेतल्यानंतर ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने ऑफलाईन नोंदणी करण्याची मागणी राज्याच्या टास्क फोर्समार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने त्याला नकार दिल्याने कोविन ॲपमध्ये सुधारणा होईपर्यंत लसीकरणाला स्थगिती देण्यात आली.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या