Join us  

Rajesh Tope: मुस्लीम समाजात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी, राजेश टोपेंनी केलं महत्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:24 PM

Rajesh Tope On Corona Vaccination: लसीकरणासंदर्भातील अफवा आणि गैरसमजुतींवरही टोपे यांनी यावेळी भाष्य केलं.

Rajesh Tope On Corona Vaccination : कोरोनाच्या लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अव्वल असला तरी हवातसा पुरवठा केंद्राकडून केला जात नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात त्यांनी महत्वाची माहिती यावेळी परिषदेत दिली. राज्यात लसीकरणाची केंद्र वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच पण नागरिकांनीही पुढाकार घेऊन लस टोचून घेतली पाहिले, असं राजेश टोपे म्हणाले. 

लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

लसीकरणासंदर्भातील अफवा आणि गैरसमजुतींवरही टोपे यांनी यावेळी भाष्य केलं. लसीकरणात मुस्लीम समाजाचं प्रमाण अत्यंत कमी असल्याची माहिती टोपे यांनी दिली. "लसीकरण करुन घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी लस टोचून घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे लसीकरणाबाबतीत कोणत्याही गैरसमजुतींना बळी पडण्याचं कारण नाही. समाजातील सर्व घटकांनी लसीकरण करुन घ्यावं. मुस्लीम समाजात लसीकरणाचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं आहे. यांसदर्भात अबू आझमी आणि इतर मुस्लीम आमदारांशी माझं बोलणं झालं असून त्यांनी मुस्लीम समाजात लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठीची विनंती केली आहे. याशिवाय मुस्लीम समाजाचे अनेक मौलवी आणि धर्मगुरूंशी देखील चर्चा करणार असून त्यांच्या माध्यमातून समाजात लसीकरणाचं आवाहन करण्यासाठी बोलणार आहे", असं राजशे टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

आठवड्याला ४० लाख डोस हवेतदेशात लसीकरणाच्याबाबतीत महाराष्ट्र नंबर एकचं राज्य ठरत आहे. त्यामुळे राज्याची गरज लक्षात घेता केंद्रानं महाराष्ट्राला दरआठवड्याला कोरोना लशीचे ४० लाख डोस पुरवावेत अशी मागणी टोपे यांनी केली आहे. राज्यात लसीकरण वेगानं होतंय आणि यापुढील काळात याचा वेग आणखी वाढवला जाईल. पण त्याच तुलनेत लशीचा पुरवाठा देखील राज्याला व्हायला हवा, असं टोपे म्हणाले. 

राज्यात फक्त ३ दिवस पुरेल इतकाच साठाराज्यात १४ लाख इतकाच लशीचा साठा शिल्लक असून तो तीन दिवसांत संपेल. त्यामुळे केंद्रानं याची नोंद घेऊन मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर लस राज्यांना द्यायला हवी. केंद्र सरकार लशीचा पुरवठा करत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण होणारा पुरवठा आणखी वेगानं व्हायला हवा, असं राजेश टोपे म्हणाले.  

टॅग्स :राजेश टोपेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस