Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 18:03 IST

Corona Vaccination : आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे.

मुंबई : आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून असलेल्या नागरिकांना ३० जुलैपासून त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रयोग जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागात केला जाणार आहे. आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे.  

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६९ लाख ६६ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खाजगी केंद्रांमार्फत लसीकरण, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र आजारपण, शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन कोविड लस देण्यासंदर्भात मागणी केली जात होती.  

राज्य शासनाने संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण अशी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली होती. आतापर्यंत अशा ४४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपूर्ण साधला आहे. 

'यांना' मिळणार लस... - अशी व्यक्ती पुढील किमान सहा महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करावे लागेल. - अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत. त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत आवश्यक सर्व प्रक्रिया पाळण्यात येईल.  - प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे.  

टॅग्स :कोरोनाची लसमुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस