Corona Vaccination: Does anyone get vaccinated? Where there is discipline, where there is confusion | Corona Vaccination: कोणी लस देता का लस? कुठे शिस्त, तर कुठे गोंधळ

Corona Vaccination: कोणी लस देता का लस? कुठे शिस्त, तर कुठे गोंधळ

मुंबई  : मुंबई शहर आणि उपनगरांत कोरोनाचे सावट आता गडद होत असतानाच दुसरीकडे मात्र लसीकरणाचा गोंधळ सुरू झाला आहे. मुंबईत शुक्रवारी दुपारपर्यंत पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याने मुंबईतल्या बहुतांशी केंद्रांसह रुग्णालयांत लसीकरणासाठी दाखल झालेल्या नागरिकांना लस घेण्यात अडथळे येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे लस घेणारे बहुतेक जण हे ज्येष्ठ नागरिक असून, काही नागरिक हे ४५ वर्षांवरील आहेत. काही लसीकरण केंद्रांत शिस्त पाळली जात असून, काही लसीकरण केंद्रांत मात्र किंचित गोंधळ आहे. माहीमसारख्या लसीकरण केंद्रावर लसीचा साठाच शिल्लक नसल्याचा बोर्ड लागला असून, मालाड किंवा घाटकोपर भागात व्यवस्थित लसीकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

‘लोकमत’ने अशाच काहीशा लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांशी, त्यांच्या मुलांशी, लस घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला. कुर्ला येथील एका तरुणीला आपल्या वृद्ध आई-वडिलांना कोरोनाची लस द्यायची आहे. मात्र लस कुठे उपलब्ध आहे ? येथून गोंधळ असून, नक्की कोणती लस मिळणार? यात आणखी संभ्रम आहे. मुळात कोव्हॅक्सिन की कोव्हिशिल्ड लस मिळणार? याबाबत पुरेशी माहिती नाही. अनेकांना कोव्हिशिल्ड लस पाहिजे असून, अनेकांनी तर कोव्हॅक्सिन घेतल्याने ताप येतो, असेही सांगितले आहे. आता ही माहिती त्यांना ऐकीव प्राप्त झाली असून, त्यांनी याबाबत कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञासोबत बोलणे केलेले नाही. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम नीट सुरू आहे, असे एका ४५ वर्षीय नागरिकाने सांगितले. पश्चिम उपनगरात काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मालाड येथील सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र येथे काही अडचण नसल्याचे सांगितले. घाटकोपर येथील एक नागरिकाने देखील शिस्तीत लसीकरण होत असल्याची माहिती दिली. लसीकरणाचा साठा अपुरा असला तरी जेथे लस उपलब्ध आहे, तिथे लसीकरणाचा कार्यक्रम नीट सुरू आहे. मात्र, काहीशा अंतराने नागरिकांना किंचित त्रास होत असल्याची स्थिती आहे.

६०% लसीकरण केले पाहिजे
नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने तरुण मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण याच वयोगटात जास्त दिसून आले आहे. त्यांना लसीची गरज सर्वांत जास्त आहे. हा कोविड स्प्रेडिंग गट कमी करून समाजाची हर्ड इम्युनिटी तयार करायची असेल तर कमीत कमी ६० टक्के लसीकरण केले पाहिजे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची भूमिका घेतली आहे.

नुसतेच आकडे
मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील सध्याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून, ती दररोज एक लाखावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आणखी २६ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या ५९ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे.

कुठे गेले निर्देश
जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्यास अधिकाधिक नागरिक लस घेऊ शकतील. शक्य असल्यास आणि पुरेशी व्यवस्था करणे शक्य असेल तर २४ तास लसीकरणाची सोय करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

म्हणे चिंता बाळगण्याचे कारण नाही
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून, नागरिकांनी चिंता बाळगण्याचे कारण नाही. 
मुंबईत महापालिकेच्या २४ व शासकीय ८ अशा मिळून ३२ रुग्णालयांत दररोज ४१ हजार जणांना लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत चार हजार जणांना दररोज लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

सोयी-सुविधा केवळ कागदावरच
सध्या रोज दिवसाघडीला ३० ते ४० हजार लसीकरण होत आहे आणि महापालिकेचे लक्ष्य आहे की, दिवसाला निदान १ लसीकरण तरी झाले पाहिजे; पण २४/७ तास लसीकरण आणि झोपडपट्ट्या ते लसीकरण केंद्रापर्यंत वाहनांच्या सोयी-सुविधा केवळ कागदावरच आहेत. वृद्ध नागरिक आणि अत्यावश्यक रुग्ण हे सुरुवातीला प्राधान्यक्रम होते. मात्र, लसीकरणाच्या प्रक्रियेच्या मंद गतीमुळे लसीकरणाचा पुढचा टप्पा, ज्यामध्ये मुंबईची वर्किंग क्लास लोकसंख्या आहे तिचे लसीकरण करण्यात अडथळा निर्माण येत आहे.

लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होईल?
७० ते ८० टक्के लोकांमध्ये लस घेतल्यानंतर चांगला परिणाम दिसून आला आहे; पण कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. कोविड-१९ लस ही दोन टप्प्यांत दिली जात आहे. एकदा लस घेतल्यानंतर महिन्याभराने दुसरी लस दिली जाते. दोन्ही लसींचे डोस घेतल्यानंतर शरीरात विषाणूशी लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार होतात. म्हणून या महिन्याभराच्या कालावधीत स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मुळात लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होईल का हे सांगणे अवघड आहे.

घाटकोपरमधील हिंदू महासभा हाॅस्पिटल येथे भेट दिली. शासनाचा उपक्रम अतिशय शिस्तबद्ध राबविला जात असल्याबाबत हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ. वैभव यांना धन्यवाद देऊन त्यांना साथ देणारा कर्मचारी वर्ग अथक परिश्रमातसुद्धा चेहऱ्यावरचा आनंद टिकवून रुग्णांना जी मनोभावे सेवा देत आहेत, त्यांचे मनापासून आभार मानले.
    - डॉ. सुरेंद्र मोरे, अध्यक्ष, मुंबई जिल्हा उपनगर को- ऑप. हौसिंग फेडरेशन लि.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccination: Does anyone get vaccinated? Where there is discipline, where there is confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.