नागपूर : राज्यातील ८ विभागांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस उपलब्ध झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरीत्या विकसित केलेली कोविशिल्डचा ८ लाख ३९ हजार डोस त्या-त्या उपसंचालक आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यात सर्वाधिक, १ लाख ६२ हजार डोस पुणे विभागाला, तर सर्वांत कमी, ५५ हजार ५०० डोस लातूर विभागाला मिळाल्या आहेत. नागपूर विभागाला ९६ हजार डोस उपलब्ध झाले आहेत.राज्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ९ लाख ७३ हजार लसीचे डोज उपलब्ध झाले होते. १६ जानेवारीपासून सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली, परंतु १५ दिवसांचा कालावधी लोटूनही लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांच्या पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी जवळपास ११ ते १२ जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांच्या खाली लसीकरण होत आहे. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला, त्यांना लस टोचल्याच्या २८ दिवसांनंतर, म्हणजे १३ फेब्रुवारीनंतर दुसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांसाठी ९ हजार १०० वायल्स उपलब्ध झाले असून, यात ९१ हजार डोस आहेत.नाशिक विभागातील नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा मिळून १० हजार ५५० वायल्स मिळाल्या आहेत. यात १ लाख ५५ हजार डोस आहेत.पुणे विभागातील पुणेसह सोलापूर व सातारा जिल्हा मिळून १६ हजार २०० वायल्स मिळाल्या. यात १ लाख ६२ हजार डोस आहेत.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ८ हजार वायल्स उपलब्ध झाल्या आहेत. यात ८० हजार डोस आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, हिंगोली, जालना व परभणी जिल्हे मिळून ६ हजार २५० वायल्स मिळाल्या. यात ६२ हजार ५०० डोस आहेत.लातूर विभागातील लातूरसह बीड, नांदेड व उस्मानाबाद जिल्हे मिळून ५ हजार ५५० वायल्स उपलब्ध झाल्या. ५५ हजार ५०० डोस आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी १ लाख ५७ हजार डोसविदर्भातील नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा जिल्ह्यांसाठी ९ हजार ६०० वायल्स मिळाल्या. यात ९६ हजार डोस आहेत. यात नागपूरसाठी ३८ हजार ५०० डोस आहेत. अकोला विभागातील अकोलासह अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांसाठी १ हजार ५०० वायल्स मिळाल्या असून, यात ६१ हजार डोस आहेत. एकूण ११ जिल्ह्यांसाठी १ लाख ५७ हजार डोस उपलब्ध झाले आहेत.
Corona vaccination: लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 8 लाख 39 हजार डोस, सर्वाधिक डोस पुणे विभागाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:42 IST