Join us  

Maharashtra Vidhan Sabha: ठाकरे सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे- सुनील प्रभू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 3:21 PM

Maharashtra Vidhan Sabha Budget Session: नुकताच 1 मार्च पासून 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला. 

मुंबई: देशात सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली असतानाही राज्य सरकारने वैद्यकीय व तांत्रिक डॉक्टरांचे राज्य कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले. आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये वाढ केली. मास्क, पीपीई किटस्,  ऑक्सीजन, तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजने अंतर्गत राज्यात व्यापक प्रमाणात आरोग्य मोहीम राबवून जनतेत जनजागृती निर्माण केली. महाविकास आघाडी सरकारच्या अथक परिश्रम व प्रयत्नामुळे महाराष्ट्रात कोवडची साथ नियंत्रणात आणण्यात यश प्राप्त झाले, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर आपण आकडेवारीसह विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कोरोना संदर्भात सविस्तरपणे आकडेवारीसह विश्लेषण केल्याचे प्रभू म्हणाले.

1 मार्च 2021 च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत राज्यात आतापर्यंत 20 लाख 24 हजार 704 कोरोना रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के इतके आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 21 लाख 55 हजार 70 इतकी आहे.  तर आज पर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 154 इतकी आहे. मुंबईत अद्याप पर्यंत 3 लाख 23 हजार 877  इतके बाधीत रुग्ण आहेत. तर 11 हजार 461 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रात एकूण चाचण्या 1 कोटी 92 लाख 416 इतक्या प्रचंड प्रमाणात करण्यात आल्यामुळेच करोना नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.

राज्यात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 3 कोटी आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दि.16 जानेवारीपासून सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन मोफत लस देण्यास सुरुवात केली आहे. नुकताच 1 मार्च पासून 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला. 

राज्यात करोनाची साथ आटोक्यात येत असताना माहे जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, अमरावती आदि भागासह संपूर्ण राज्यात दररोज 8 हजाराहून अधिक रुग्ण तर एकट्या मुंबईत काल 849 रुग्ण पॉझिटीव्ह होते.  

सदरहू वाढत्या संसर्ग साथीवर नियंत्रण आणण्यासाठी आघाडी सरकारने रुग्णालये सज्ज करुन गर्दीची ठिकाणे टाळणे, सार्वजनिक कामावर नियंत्रण आणणे, आवश्यक त्या ठिकाणी लॉकडाऊन करणे, आदि उपाययोजना सुरु आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच जनतेला माहे जून 2021 अखेर पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यासाठी आघाडी शासन वचनबद्ध आहे, त्यादृष्टीने सरकार कार्यवाही करत असल्याची महिती त्यांनी दिली.मुंबई महापालिकेने देखील यंदाच्या बजेटमध्ये 1 कोटी लसीकरणाचे लक्ष निर्धारित केले असून मुंबईतील 8 रुग्णालयांच्या पुनर्विकास आणि सुविधांसाठी 100 कोटीहून अधिक निधी उपलब्ध करुन दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या मार्च 2020 पासून आत्तापर्यंत राज्यात 51 हजार तर मुंबईत 11 हजार कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये अनेक कुटुंबातील कुटुंबाप्रमुखचाच अथवा कुटुंबातील कुटुंब प्रमुखांसह एका पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या असल्याने सदर कुटुंबे आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाच्या मृत्युमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य अथवा रोजगार शासनाने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनेचा गंभीर्यापणे विचार करा अशी सूचना आमदार प्रभू यांनीं केली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारमुंबईसुनील प्रभू