Corona tests of 14,000 suspects in Mumbai | मुंबईत १४ हजार संशयितांच्या कोरोना चाचण्या

मुंबईत १४ हजार संशयितांच्या कोरोना चाचण्या

मुंबई -  मुंबई महापालिका रुग्णालयातील पाच आणि आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये १४ हजार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९ हजार चाचण्या मागील सात दिवसांत केल्या आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

कोरोनाची वैद्यकीय तपासणी, चाचणी आणि उपचाराची सुविधा केवळ पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत तपासणीची सुविधा पालिकेच्या पाच तर आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये सुरू करण्यात आली.पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन करोनाची लक्षणे आढळणाऱ्यांचा शोध घेत आहेत. लक्षणे आढळताच संबंधित व्यक्तीची करोनाविषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये १४ हजार करोना संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्यामुळे करोनाबाधित रुग्ण निदर्शनास येत  आहेत. विलगीकरणासाठी पालिकेने हॉटेल, धर्मशाळा, लॉज आदींमधील तब्बल ११ हजार ३०० खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात आजमितीस २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ हजार जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये ११ हजार २३२ जणांच्या चाचण्या , दिल्लीत आठ हजार ४६४, कर्नाटकमध्ये सहा हजार ५८० आणि तमिळनाडूत पाच हजार ३०५ यांचा क्रमांक लागतो.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona tests of 14,000 suspects in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.