Join us

कोरोनामुळे बड्या शाळा ठेवणार बंद; शालेय शिक्षण विभागाचे कुठलेही आदेश नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 05:49 IST

काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे

मुंबई : मुंबईतील काही नामवंत आंतरराष्ट्रीय शाळांच्या व्यवस्थापनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, वेळापत्रकात बदल केला आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने अद्याप शाळा बंद ठेवण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (बीकेसी), रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल; दहिसर आणि गोरेगावमधील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल या शाळांनी त्यांची उन्हाळी सुट्टी आताच घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅथड्रल स्कूल; फोर्ट, वसंतविहार (ठाणे) आणि विट्टी इंटरनॅशनल स्कूल यांच्या व्यवस्थापनांनी पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, तो अंमलातही आणला आहे. अंधेरीतील उत्पल संघवी ग्लोबल स्कूल ३१ मार्चपर्यंत बंद राहील, असे शाळा व्यवस्थापनाने पालकांना ई-मेलद्वारे कळविले आहे. सरकारकडून सूचना येईपर्यंत शाळा ३१ मार्चपर्यंत सुरू राहील, असे ठाण्यातील आॅर्चिड स्कूलने स्पष्ट केले असून नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे नसेल तर तशी सूट राहील, असे पालकांना कळविण्यात आले आहे.

काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे देशांतील इतर राज्यांतील शाळा कोरोनाच्या भीतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेत असतील तर राज्य सरकार काय करत आहे, असा सवाल पालक संघटना आणि शिक्षक उपस्थित करत आहेत.वाट पाहावी लागेलराज्यात दहावीच्या तसेच इतरही परीक्षा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने असा निर्णय घेताना विचार करावा लागेल. सरकार दोन दिवस वाट पाहणार आहे. आवश्यकता वाटली तर शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :कोरोनाशाळा