Join us  

कोरोना रुग्णांचे मेडिक्लेम आठ हजार कोटींवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 4:15 PM

Corona mediclaim : ऑक्टोबर महिन्यांत सर्वाधिक वाढ

मुंबई : आँक्टोबर महिन्यांत देशातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी होताना दिसत असला तरी याच महिन्यांत आजवरचे सर्वाधिक ३६७३ कोटींचे मेडिक्लेम दाखल झाले आहेत. सप्टेंबर अखेरीपर्यंत विमा कंपन्यांकडे २ लाख ७ हजार रुग्णांचे ३३०० कोटी रुपयांचे क्लेम आले होते. आँक्टोबर अखेरीपर्यंत क्लेम करणा-या रुग्णांची संख्या ५ लाख १८ हजारांवर झेपावली आहे. तर, त्यांनी मागितलेला उपचार खर्चांचा परतावा ७ हजार ९७३ कोटी रुपयांवर गेला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण उपचारांसाठी दाखल होत होते. त्यापैकी अनेकांचे क्लेम आँक्टोबर महिन्यात दाखल झाले आहेत. त्याशिवाय कोरोना कवच आणि रक्षक या दोन पाँलिसींमुळे लाखो भारतीयांना विमा कवच प्राप्त झाले आहे. त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे क्लेमची संख्या वाढल्याचे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यांत आरोग्य विमा कंपन्यांकडे कोरोनासह अन्य आजारांवर उपचार घेणा-या रुग्णांचे ११ हजार ५०० कोटी रुपयांचे मेडिक्लेम दाखल झाले होते. त्यात २९ टक्के वाटा हा कोरोना रुग्णांचा होता. तो टक्का आता ३५ च्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.

 २४ टक्के रुग्णांना परताव्याची प्रतीक्षा

आरोग्य विमा असलेल्या ५ लाख १८ हजार रुग्णांनी मेडिकेल्मसाठी अर्ज केले असून त्यापैकी ३ लाख ९७ हजार रुग्णांचे क्लेम मंजूर झाले आहे. या रुग्णांचा उपचांरोपोटी झालेला सरासरी खर्च १ लाख ५३ हजार रुपये आहे. मात्र, मंजूर होणारा सरासरी खर्च ८६,२२५ रुपये इतका आहे. आजवर ३ लाख ९७ हजार रुग्णांना मेडिक्लेमपोटी ३,४३५ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याची माहिती जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडून हाती आली आहे.   

 दुस-या लाटेचा घोर

विमा कंपन्यांकडे प्रिमियमपोटी जमा होणा-या रकमेत वाढ होताना दिसत असली तरी खर्चातील वाढ त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचा घोर वाढला आहे. विमा कंपन्या प्रिमियम पोटी जेवढी रक्कम वसूल करतात त्यापैकी ६० ते ६५ टक्के रक्कम परताव्यापोटी द्यावी लागत होती. परंतु, ते प्रमाणही आता जवळपास ८० टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत असले तरी हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्देवाने ती भीती खरी ठरली तर विमा कंपन्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक