Join us

कोरोना संसर्गाचा एसटी महामंडळाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:50 IST

उत्पन्न तीन कोटींवर; प्रवासी संख्येतही घट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. निर्बंधांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत तब्बल २० लाखांची घट नोंदवण्यात आली आहे. तर शुक्रवारी १६ एप्रिल राेजी उत्पन्न तीन कोटींवर आले.राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या ३२ लाख २२ हजार होती आणि उत्पन्न ७.७८ कोटी होते. वीकेंड लॉकडाऊननंतर प्रवासी संख्येत घट होत गेली. १५ एप्रिलला कडक निर्बंध जारी करण्यात आल्यानंतर वाहतुकीला मोठा फटका बसला. प्रवासी संख्येत घट होऊन ती १२ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली, तर शुक्रवार १६ एप्रिल २०२१ राेजी केवळ तीन कोटींचे उत्पन्न मिळाले. याआधी १ एप्रिलला ७.७८ काेटी एवढे उत्पन्न मिळाले हाेते.कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी १० एप्रिल आणि रविवारी ११ एप्रिल रोजी प्रवासी संख्या कमी झालेली पाहायला मिळाले. ९ एप्रिल रोजी प्रवासी संख्या २९ लाख होती. १० एप्रिलला १३ लाख तर ११ एप्रिल रोजी घट होऊन ६.७७ लाखांवर आली.

दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यूएसटीतील कोरोनबाधितांचा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे. तर, दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना काळात सेवा देताना राज्यातील एकूण ५२३८ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. ११८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांची यामध्ये नोंद नसून हा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे. तर दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :एसटी