मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 19:20 IST2020-04-08T19:19:55+5:302020-04-08T19:20:30+5:30
कोरोनामुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत.

मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव
मुंबईः कोरोनामुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. जागतिक पातळीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जगभरातील हवाई वाहतूकीमध्ये मार्च महिन्यात 66.8 टक्के घट झाली आहे. भारतात तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी आल्याने भारतातील अवकाश जवळपास रिकामे झाले आहे. जी काही किरकोळ विमान वाहतूक सुरु आहे त्यामध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचा समावेश आहे.
भारतातील विमान वाहतूक सुरु झाल्यानंतरही त्याला पूर्वीप्रमाणे प्रवाशांचा प्रतिसाद मिळायला मोठा कालावधी जाण्याची शक्यता सेंटर फॉर एशिया पँसेफिक एव्हिएशन ( सीएपीए) ने वर्तवली आहे. यामुऴे विमान कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ होईल व ज्या विमान कंपन्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्या कंपन्या यामध्ये तग धरु शकतील इतर कंपन्यांचा मार्ग फार खडतर असण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिने ते वर्षभरात विमान वाहतुकीमध्ये उड्डाणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे परिणामी भारतातील एकूण 650 पैकी 200 ते 250 विमाने अतिरिक्त ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विमान प्रवाशांमध्ये झालेली घट भरुन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास विलंब होईल. अर्थव्यवस्था खालावलेली असल्याने त्याचा परिणाम ग्राहक संख्येवर होईल, परस्पर पूरक व्यवस्था डबघाईला आलेली असल्याने ही साखळी पूर्ववत होण्यासाठी वेळ द्यावा लागेल. भारतात मे, जून व जुलै महिन्यात दरवर्षी होणाऱ्या तिकीट आरक्षणाच्या तुलनेत सध्या आरक्षण 80 टक्के पेक्षा अधिक खालावले आहे.
देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 80 दशलक्ष वरुन 35 ते 40 दशलक्षवर येण्याची व देशांतर्गत प्रवाशांची संख्या 140 दशलक्ष वरुन 80 ते 90 दशलक्ष पर्यंत खालावण्याची भीती सीएपीए ने वर्तवली आहे