Join us  

कोरोना : दिवस हिवाळ्याचे आहेत; गाफील राहू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 5:18 PM

Corona News : लक्षणे जाणवल्यास कोविड चाचणी करवून घ्यावी.

मुंबई : दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस आहेत. आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. परिणामी कोविडची कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. आणि कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊ नये म्हणून मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.जगातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून भारतातील काही शहरांमध्ये देखील कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत टाळेबंदीसारखी कठोर उपाययोजना करण्यावाचून गत्यंतर राहत नाही. ती वेळ मुंबई महानगरावर पुन्हा येता कामा नये, यासाठी पावलोपावली खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजघडीला कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी १७ हजार ४६७ खाटांची व्यवस्था असून यापैकी १२ हजार ५२९ खाटा या रिक्त आहेत. प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता खाटा, व्हेन्टीलेटरची व्यवस्था आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा प्रकरणी अधिक व्यापकपणे सातत्यपूर्ण कार्यवाही करण्यात येत आहे. मास्कचा नियमित वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून केले जात आहे.महापालिकेच्या अखत्यारितील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असून, दुकानदार, दुकानात - हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक - वाहक इत्यादींची कोविड विषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली असून, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊ नये म्हणून मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील केले आहे. शिवाय कोरोनाची दुसरी लाट मुंबईकरच थोपविणार, असा विश्वासही व्यक्त केला आहे.---------------------गाफील राहू नका- मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग करावा- सुरक्षित अंतर राखावे- सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये---------------------एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण ४०० जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक