Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांच्या खात्यावरून पैशांचे 'कॅश'मध्ये रूपांतर; राजस्थानातील पाली येथून आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:08 IST

पेट्रोल पंपांच्या माध्यमातून रोख रकमेत रूपांतरित करण्याचा चलाख आणि नवा प्रकार उघडकीस

मुंबई : सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा पेट्रोल पंपांच्या माध्यमातून रोख रकमेत रूपांतरित करण्याचा चलाख आणि नवा प्रकार उघडकीस आला असून, सर जे. जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी राहुल कुमार शैतानमल सेन (२३) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील पाली येथील रहिवासी असलेला सेन हा या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. तो पेट्रोल पंपांच्या खात्यांद्वारे फसवणुकीतील रक्कम फिरवून ती रोख स्वरूपात बदलण्याचे काम कमिशनच्या मोबदल्यात करत होता. या प्रकरणात आफताब सय्यद (२२), मोहम्मद शादाब खान (२५), अब्दुल कादीर (४०), अमित मिश्रा (३३) आणि सनोज ऊर्फ पिंटू सिंग (३८) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

तपासात उघड झाले की, ही टोळी प्रथम ऑनलाइन फसवणुकीद्वारे पैसे मिळवत असे. त्यानंतर त्या पैशांचा माग काढता येऊ नये म्हणून ते विविध बँक खात्यांमधून फिरवले जात होते. अखेरीस ही रक्कम पेट्रोल पंपांच्या खात्यांमध्ये जमा करून ती रोख स्वरूपात काढण्यात येत होती. या रॅकेटमधील प्रत्येकाचे काम ठरलेले होते. काही जण बनावट किंवा भाड्याने घेतलेली बँक खाती उपलब्ध करून देत, तर काही जण निधी हस्तांतरणाचे काम करायचे, तर काही सदस्य पेट्रोल पंपांवर रोख व्यवहार सांभाळत होते. प्रत्येकाला त्यांच्या कामानुसार कमिशन दिले जात होते.

आंतरराज्यीय रॅकेट ... 

मोबाइल तपासातून या प्रकरणाचा संबंध इतर संशयितांशी असल्याचे समोर आले असून, हे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील ७४ हजार रुपये गोठवण्यात आले आहेत. अन्य आरोपी आणि या रॅकेटच्या सूत्रधाराचा शोध सुरू असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

डिजिटल व्यवहारासारखा आभास निर्माण करायचे 

पेट्रोल पंपांवर ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली जात असे आणि त्याच रकमेची बँकेत नोंद करून डिजिटल व्यवहारासारखा आभास निर्माण केला जात होता. यामुळे फसवणुकीचा पैसा सहज रोख स्वरूपात बदलला जात होता. पोलिसांनी आरोपींकडून ४७ हजार रुपये रोख, अनेक मोबाइल फोन आणि महत्त्वाची बँक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत.

अतिशय सराईतपणे ऑनलाइन फसवणुकीद्वारे पैसे मिळवायचे आणि विविध बँक खात्यांमधून फिरवल्याने त्या पैशांचा माग कुणालाही काढता यायचा नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol Pump Scam: Money Laundering Via Cash Conversion Busted, Arrest Made

Web Summary : A cyber fraud scheme converting illicit funds into cash via petrol pumps was exposed. Police arrested Rahul Sen from Rajasthan. The gang used petrol pump accounts to launder money, creating fake digital transactions. Rupees 74,000 frozen; investigation ongoing.
टॅग्स :मुंबईसायबर क्राइमपोलिस