Join us

मुलांचा ताबा देताना सुखसुविधांचा विचार आवश्यक, अल्पवयीन मुलीला आईकडे द्या: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 07:22 IST

एका अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या आईकडे देताना उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कल्याण या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. मुलांचे शारीरिक, मानसिक कल्याण, त्यांचे आरोग्य, सुखसोयी, सर्वांगीण सामाजिक आणि नैतिक विकास असा व्यापक अर्थ या शब्दाला आहे. सबब काडीमोड घेऊ इच्छिणाऱ्या किंवा घेतलेल्या पालकांकडे मुलांचा ताबा देण्याबाबतचा निर्णय घेतेवेळी मुलांच्या सुखसोयींचाही विचार होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या आईकडे देताना उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केले. 

यासंदर्भातील तपशील असा की, २०१० मध्ये मुलीच्या आई-वडिलांचा विवाह झाला. २०१५ मध्ये मुलीचा जन्म झाला. मात्र, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत मुलीचे वडील २०२० पासून स्वतंत्र राहू लागले. मुलगी त्यांच्याबरोबर राहात होती. मुलगी आपल्या कुटुंबाबरोबर रुळली असून तिच्या सुखसुविधांचा, सुरक्षेचा विचार होणे आवश्यक आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिला अल्पवयीन मुलीच्या संगोपनाची व कल्याणाची चिंता नाही, असा आरोप करत मुलीचा ताबा आपल्याकडेच राहावा यासाठी मुलीच्या वडिलांनी याचिका दाखल केली. मात्र, महिलेने याचिकेस विरोध करत मुलगी आठवडाभर आपल्याकडे व सप्ताहाअखेरीस वडिलांकडे राहायची, असे न्यायालयाला सांगितले. वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये मुलीच्या आईची बाजू घेत मुलीचा ताबा तिच्याकडे देण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते.

उच्च न्यायालय म्हणाले...

मुलांचे हित विचारात घेताना मुलांच्या सुखसोयी, हा एक घटकही विचारात घेणे आवश्यक आहे. मुलगी आठ वर्षांची असून तिच्यात शारीरिक बदल होत आहेत. मुलीच्या वाढीच्या या टप्प्यात खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आई डॉक्टर असताना आजी वा आत्या पर्याय असू शकत नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर मुलीला अशा स्त्रीची गरज असते, जी तिच्यातील बदलाची प्रक्रिया समजून घेण्यास सज्ज असेल. त्यामुळे मुलीच्या वयाच्या या टप्प्यात आईला प्राधान्य देण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई हायकोर्ट