'मातोश्री' बाहेर ड्रोनच्या घिरट्यांनी वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पॉड टॅक्सी सर्वेक्षणाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 07:16 IST2025-11-10T07:15:44+5:302025-11-10T07:16:06+5:30
Matoshree Drones News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर रविवारी सकाळी ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मात्र, हे ड्रोन 'एमएमआरडीए'चे असल्याचा खुलासा पोलिसांनी केला.

'मातोश्री' बाहेर ड्रोनच्या घिरट्यांनी वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पॉड टॅक्सी सर्वेक्षणाचा दावा
मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर रविवारी सकाळी ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मात्र, हे ड्रोन 'एमएमआरडीए'चे असल्याचा खुलासा पोलिसांनी केला.
आ. आदित्य ठाकरे यांनी टीका करीत, असा कोणता सर्व्हे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यास परवानगी देतो? असा सवाल केला. ड्रोन मातोश्रीजवळ उडत असल्याची माहिती व्हायरल होताच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
आमच्या निवासस्थानाच्या परिसरात एक ड्रोन घरात डोकावताना आढळले. असे कोणते सर्वेक्षण असते जे लोकांच्या घरात डोकावते आणि लक्षात येताच लगेच उडून जाते ? रहिवाशांना याबाबत पूर्वसूचना का देण्यात आली नाही ? एमएमआरडीए संपूर्ण बीकेसीचा सर्व्हे करीत आहे की फक्त आमच्या घरावर नजर ठेवत आहे ? एमएमआरडीएने घरांवर ड्रोन उडविण्यापेक्षा आपल्या अपूर्ण आणि निकृष्ट कामांकडे लक्ष द्यावे', असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
नेमका सर्व्हे कशासाठी ?
'एमएमआरडीए'नुसार, मुंबईतील पॉड टॅक्सी प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविला जात असून, गेले दोन दिवस कंत्राटदाराने कुर्ला ते बांद्रा (बीकेसीमार्गे) या मंजूर मार्गावर ड्रोन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा उद्देश मार्गाचे दृश्य मूल्यांकन करणे हा होता.
पोलिस विभागाकडून सर्व आवश्यक परवानग्या एमएमआरडीएने कंत्राटदाराच्यावतीने प्राप्त केल्या होत्या आणि दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. प्रमाणित ड्रोन ऑपरेटरने, पोलिस व कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण केले.