Join us

उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:12 IST

निकम यांच्या नियुक्तीस काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून आता राजकीय वाद सुरू झाला आहे. निकम यांच्या नियुक्तीला काँग्रेस पक्षाने विरोध केला असून या सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे, तर मी पुन्हा वकिलाची भूमिका सुरू केल्याने काँग्रेसचे नेते त्रस्त का झाले आहेत, असा सवाल ॲड. उज्ज्वल निकम यांनी केला आहे.  

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. निकम यांच्या नियुक्तीस काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.     

मी विशेष सरकारी वकिलाची भूमिका पुन्हा सुरू केल्याने काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते का त्रस्त झाले आहेत. मी गुन्हेगार किंवा गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्यांविरुद्ध राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने त्यांना कशाची भीती वाटते आहे का? जर ते फालतू आक्षेप घेत राहिल्यास, मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना दिला.

टॅग्स :उज्ज्वल निकमभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४