मनोहर कुंभेजकरमुंबई - कांदिवलीत मराठी माणसाचे दुकान हडप केल्याचा व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वादग्रस्त लालसिंह राजपुरोहित यांची पुन्हा चारकोप व कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शिंदेसेनेचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
राजपुरोहित व त्यांच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात २८ डिसेंबर रोजी पालिकेच्या रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच, कांदिवलीतील मराठी कुटुंबाचे दुकान हडप केल्याप्रकरणी ८ मार्चला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राजपुरोहित यांच्या हकालपट्टीनंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याने हडप केलेले दुकान दत्ताराम पै व सुषमा पै यांच्याकडे परत केले होते.
दरम्यान, हा विभाग मराठी भाषकांचा असल्याने येथे मराठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही त्यांची पुनर्नियुक्ती केल्यामुळे मराठी माणसाचे हक्क हडप करणाऱ्यालाच पदाचे बक्षीस दिले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.