Join us  

Video: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:50 PM

भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मुंबई - सध्या देशभरात सुरु असणाऱ्या सीएए आणि एनआरसी मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. याच मुद्द्यावरुन राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी दिल्लीच्या तख्ताला विचारु इच्छितो, तुम्ही आमच्याकडे देशातील नागरिक असल्याचे पुरावे मागणार का? मग ऐका, जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होते. 

भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भिवंडीतील पुरोगामी पक्ष, संघटनांच्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आव्हाड म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात असून याविरोधात आपण स्वत: ठाणे येथे पहिले आंदोलन केले. जोपर्यंत हा कायदा केंद्र मागे घेत नाही, तोपर्यंत जेथे जेथे आंदोलन होईल, तेथेतेथे मी सहभागी होणार आहे. देशात पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. हा कायदा हिटलरशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक लागू केला आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेला छेद देणारा असल्याने कायद्याविरोधातील लढाई ही डॉ. आंबेडकरांची गोळवलकरांशी लढाई आहे, असेही आव्हाड म्हणाले. या कायद्याला विरोध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील प्रत्येक चौकाचौकांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या कायद्याला आपला विरोध दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडनरेंद्र मोदीनागरिकत्व सुधारणा विधेयक