Join us

बांधकाम मजुरांचे हातावर पोट, पोटासाठी रोज जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:10 IST

मजुरांना त्यांचे कंत्राटदार कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवत नसल्याचे या दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : नागपाडा येथे इमारतीच्या टाकीत साफसफाई करताना गुदमरून चार मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर आता या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात आलेल्या या मजुरांकडून कंत्राटदार जोखमीची कामे करून घेतात. तुटपुंज्या मोबदल्यातर मिळेल तिथे काम करून हे मजूर गुजराण करतात, असे एका माहीतगाराने सांगितले. जोखमीची कामे करणाऱ्या मजुरांना त्यांचे कंत्राटदार कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवत नसल्याचे या दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

भायखळा आणि नागपाडा परिसरात सुरू असलेल्या अनेक इमारतीच्या प्रकल्पांवर पश्चिम बंगालमधून आलेले मजूर काम करतात. टाकीत उतरल्याने प्राण गमावलेले कामगार हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सर्वनगर-नऊग्राम येथील राहणारे होते. सध्या ते भायखळा परिसरातच वास्तव्याला होते. रोजंदारीसाठी मुंबईत कुठेही हे कामगार जातात. ते सुतारकामापासून ते साफसफाईपर्यंत सर्व कामे करतात. कमालीचे दारिद्र्ध असल्याने मुंबईत मिळेल ते काम करण्यासाठी आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी येतात. एकेका गावातील चारशे ते पाचशे मजूर मुंबईत आल्याचे रफिक शेख याने सांगितले.

कंत्राटदाराचे काम 

आम्ही कंत्राटदाराला काम दिले होते आणि सुरक्षा व्यवस्था पाहणे किंवा टाकीची स्थिती पाहणे, हे त्याचे काम होते - मोहसीन इकबाल, बिस्मिल्ला स्पेसच्या विकासकाचा प्रवक्ता

भाऊ गेल्याने कुटुंबावर आघात

 माझा भाऊ गेल्या दहा वर्षांपासून अशा पद्धतीची कामे करतो. त्याला पाण्याच्या टाकीचा साफसफाईचा अनुभव होता. मात्र, या वेळेस कशामुळे टाकीत गॅस तयार झाला होता, याची त्याला कल्पना आली नसावी. माझ्या भावाच्या मृत्यूमुळे कुटुंबाची मोठी हानी झाली आहे -अतिउला शेख, मृत जियाउला शेखचा भाऊ 

टॅग्स :मुंबईअपघातमुंबई पोलीस