पर्यायी व्यवस्थेपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्य देत राहा, देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:33 IST2025-08-06T13:32:39+5:302025-08-06T13:33:12+5:30
कबुतरांच्या विष्ठेमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तांत्रिक उपायांचा विचार करावा.

प्रतिकात्मक फोटो
मुंबई : मुंबईतीलकबुतरखाने तत्काळ बंद करणे योग्य नाही. कबुतरांचे रक्षण, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचे आरोग्य याचा समतोल राखणे गरजेचे आहे. या पक्ष्यांची उपासमार होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवायला हवा. त्यासंदर्भात वेळेची नियमावली तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले.
कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या संदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात. पक्षीगृह उभारून त्याची योग्य देखभाल करावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण व सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने याबाबत अभ्यास अहवाल तयार करावा.
कबुतरांच्या विष्ठेमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तांत्रिक उपायांचा विचार करावा. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. उच्च न्यायालयात याबाबत रिट याचिकेवरील सुनावणी सुरू असून, राज्य शासन आणि महापालिकेने न्यायालयात आपली स्पष्ट भूमिका मांडावी. आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयातही सरकार आपली बाजू मांडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.