नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 11, 2023 15:00 IST2023-10-11T14:59:44+5:302023-10-11T15:00:08+5:30
आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई - हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी तसेच त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.