Join us

बदलापूर-नवी मुंबई महामार्गासाठी ‘सल्लागार’; प्रकल्प कसा असेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:30 IST

‘एमएमआरडीए’कडून ‘डीपीआर’ची प्रक्रिया सुरू.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बदलापूर ते नवी मुंबई असा प्रवेश नियंत्रित महामार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारला जाणार आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे. 

बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली यांना मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या प्रवेश नियंत्रित महामार्गाचा प्रकल्प ‘एमएमआरडीए’ने हाती घेतला आहे. मुंबई-वडोदरा महामार्गावर चामटोली गावानजीक या महामार्गाला सुरुवात होणार आहे. तो बदलापूर-कटाई रस्त्याला हेदुटणेजवळ त्याचा शेवट होणार आहे. 

‘एमएमआरडीए’ने बदलापूर भागाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना यांच्याशी जोडणी देण्यासाठी हा २०.६ किमी लांबीचा महामार्ग हाती घेतला आहे. त्यासाठी १०,८३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महामार्ग एकूण ८ मार्गिकांचा राहणार असून, त्याचबरोबर स्थानिक वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा समावेश असेल. या महामार्गाच्या उभारणीसाठी डोंगराखालून तीन किमी लांबीच्या बोगद्याची उभारणी केली जाणार आहे. तर या प्रकल्पासाठी एकूण २०० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. 

प्रकल्प कसा असेल?३ किमी बोगद्याची लांबी १०,८३३ कोटी रूपये खर्च२०.६ किमी प्रकल्पाची एकूण लांबी 

वेळेची होणार बचतप्रवेश नियंत्रित मार्गामुळे बदलापूरहून मुंबईत येण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात ६० मिनिटांची, तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा मागविल्या आहेत. इच्छुक कंपन्या १७ फेब्रुवारीपर्यंत निविदा भरू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :बदलापूररस्ते वाहतूक