बनावट नकाशांच्या आधारे केलेली बांधकामे पाडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 06:24 IST2025-03-11T06:24:52+5:302025-03-11T06:24:52+5:30
बनावट नकाशे तयार केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले

बनावट नकाशांच्या आधारे केलेली बांधकामे पाडणार
मुंबई : गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, विलेपार्ले, बांद्रा, चेंबूर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच, बनावट नकाशे तयार केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
भाजप आ. विक्रांत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पालिकेच्या उपआयुक्त परिमंडळ कार्यालय ७, ५, ४ आणि ३ मध्ये बनावट नकाशे तयार करून बांधकामे करण्यात आली होती. हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह सात खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येत आहे. २० ते २२ मिळकतधारकांनी दिवाणी न्यायालयातून कारवाईस स्थगिती मिळवली आहे. मात्र, उर्वरित बांधकाम मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.