रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 05:50 IST2025-11-26T05:50:22+5:302025-11-26T05:50:58+5:30
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मंगळवारी आणखी खालावला. दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती.

रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
मुंबई : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांनी यात आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी प्रदूषण वाढत असून, यावर्षीही प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे. त्यातच एखाद्या परिसरात सलग तीन दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० वर नोंदविला गेला, तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून, तेथील बांधकामे बंद केली जाणार आहेत.
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मंगळवारी आणखी खालावला. दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीत. गुजरात, राजस्थानवरील पट्ट्यात त्याचा प्रभाव दिसला. महत्त्वाचे म्हणजे हे राखेचे कण वातावरणात अत्यंत वरच्या उंचीवर होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोंदविण्यात आलेले प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचे नाही. मुंबईमधील हवा खराब म्हणजे रोजचे प्रदूषण आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कारण हवा स्थिर राहते. हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते. प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून, गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद केली होती. यावर्षीही कारवाई सुरूच राहील.- भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका