‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 07:52 IST2025-12-10T07:51:31+5:302025-12-10T07:52:23+5:30
या बोगद्यात १.२ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसवून वीजनिर्मितीची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
मुंबई : वाढत्या पाण्याची भागवण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या गारगाई धरणाच्या बांधकामाला अखेर १० वर्षांनी मुहूर्त मिळाला. या धरणामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात दररोज तब्बल ४४० दशलक्ष लिटर पाण्याची वाढ होणार आहे. हे धरण झाल्यास मुंबईकरांना मोठा पाणी दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या अंतर्गत निधीतून बांधकामाचा खर्च भागविण्यात येईल. शिवाय धरणासाठीच्या उर्वरित वन परवानग्या, पर्यावरण परवाना व अन्य शासकीय मान्यताही कंत्राटदारानेच मिळवायची असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार पालिकेने गारगाई प्रकल्प प्राध्यान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
वर्ष २०१५ मध्ये गारगाई धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर अनेक अडथळ्यांनंतर धरणाच्या बांधकामाला मुहूर्त मिळाला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गारगाई धरणाची उंची ६९ मीटर, तर लांबी सुमारे ९७९ मीटर असणार असून धरणाखालून २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा पाण्याचा बोगदाही तयार करण्यात येणार आहे.
या बोगद्यात १.२ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसवून वीजनिर्मितीची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुढील ४ वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार
गारगाई प्रकल्प ८४४ हेक्टर जागेवर होणार असून प्रकल्पामुळे धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रस्तावही निविदेत नमूद आहे. संबंधित रस्ते, कल्व्हर्ट, मोडकसागराकडे जाणारा बोगदा, धरण सुरक्षितता यंत्रणा, स्काडा सिस्टम व आवश्यक यंत्रणांचीही उभारण्यात येणार आहे. कंत्राटदारास ४ वर्षांत प्रकल्प उभारावा लागेल.
बाधितांचे पुनर्वसन
या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६ गावांचे पुनर्वसन आणि पुनर्विकास पालिका करणार आहे. यादरम्यान गावांमधील जवळपास ६०० हून अधिक प्रकल्पबाधित कुटुंबांचे स्थलांतर व पुनर्वसन होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात धरणासाठी सध्या ३५.५१ कोटी रुपयांची तरतूद केली असून प्रकल्पासाठी तीन हजार १०५ कोटी खर्च अपेक्षित आहे.