आकांक्षी शौचालय बांधकामास स्थगिती; अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींच्या चौकशीचे विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:59 IST2025-07-18T09:59:08+5:302025-07-18T09:59:21+5:30
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्या आदेशानुसार हे काम करण्यात येत आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्तांची पुढील ३० दिवसांत चौकशी करून नियमबाह्य काम झाल्याचे सिद्ध झाले तर शासनाने त्यांच्यावर उचित कारवाई करावी, असेही आदेश अध्यक्षांनी दिले.

आकांक्षी शौचालय बांधकामास स्थगिती; अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींच्या चौकशीचे विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या आकांक्षी शौचालयाच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आल्यानंतर याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांची चौकशी करावी, तसेच या कामांना स्थगिती द्यावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्या आदेशानुसार हे काम करण्यात येत आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्तांची पुढील ३० दिवसांत चौकशी करून नियमबाह्य काम झाल्याचे सिद्ध झाले तर शासनाने त्यांच्यावर उचित कारवाई करावी, असेही आदेश अध्यक्षांनी दिले.
भाजप आमदार अमित साटम यांनी लक्षवेधीद्वारे याकडे लक्ष वेधले. या प्रकल्पांतर्गत १४ शौचालयांसाठी २० कोटींची निविदा मंजूर झाली असून, ए वॉर्डमधील पाच ठिकाणी कामही सुरू झाले आहे. एका शौचालयासाठी सव्वा कोटी ते पावणेदोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अशी कोणत्या पद्धतीची शौचालये बांधली जात आहेत? ही शौचालये सार्वजनिक पदपथांवर उभारली जात आहेत.
‘पादचारी प्रथम’ धाेरणाचा भंग
महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ धोरणाचा हा भंग आहे. ही केवळ शौचालये नसून, पालिका प्रायोजित अतिक्रमण आहे. या शौचालयांसाठी इतका मोठा खर्च का केला जात आहे? कोणते विशेष तंत्रज्ञान वापरले जात आहे? याची चौकशी करावी आणि ती ३० दिवसांत पूर्ण करावी. तोपर्यंत सर्व कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी साटम यांनी केली.
मंत्री काय म्हणाले?
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, या प्रकल्पाची चौकशी केली जाईल आणि ती ३० दिवसांत पूर्ण होईल. चौकशीत नियमभंग सिद्ध झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबईचे सौंदर्य आणि पादचाऱ्यांचे हक्क जपले गेले पाहिजेत.