धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १.२५ लाख घरांची निर्मिती; गणेशनगर-मेघवाडी, रेल्वे जमिनीवरील स्थलांतर तात्पुरते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:10 IST2025-12-17T13:09:37+5:302025-12-17T13:10:02+5:30
पात्र रहिवाशांना भाड्यात दरवर्षी पाच टक्के वाढ देणार: प्राधिकरणाची माहिती

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १.२५ लाख घरांची निर्मिती; गणेशनगर-मेघवाडी, रेल्वे जमिनीवरील स्थलांतर तात्पुरते
मुंबई: धारावीमधील गणेशनगर-मेघवाडी किंवा रेल्वे जमिनीवरील काही ठिकाणी तात्पुरते स्थलांतर टाळता येत नाही. हे सर्व कायद्याच्या तरतुदींनुसारच करण्यात येत आहे. काही हजार रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर किंवा भाडेतत्त्वावरील निवास व्यवस्था ही जवळपास १० लाख धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात अडथळा निर्माण करू शकत नाही. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुमारे १.२५ लाख घरे देण्यात येणार आहेत, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
धारावीतील सेक्टर १ मधील गणेशनगर-मेघवाडी परिसरातील सुमारे ४२ रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. कल्याणकर म्हणाले, सध्याच्या व्यवस्थेनुसार तळमजल्यावरील पात्र निवासी रहिवाशांना दर महिन्याला १८ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. स्थलांतराच्या वेळी १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर महिन्याला थेट भाडे देण्यात येईल. तर, पहिल्या मजल्यांवरील पात्र निवासी रहिवाशांना महिन्याला १५ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर त्यांनाही मासिक भाडे देण्यात येईल.
तळमजल्यावरील पात्र व्यावसायिक रहिवाशांना त्यांच्या गाळ्याच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार दर चौरस फूट १७५ रुपये मासिक भाडे देण्यात येत असून, १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर दरमहा भाडे दिले जाईल.
५% सर्व पात्र रहिवाशांना भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ देण्याची तरतूद आहे.
१२ महिन्यांनंतर वाढ लागू
संबंधित घरमालकांनी संपूर्ण रिक्त घराचा ताबा दिल्यापासून १२ महिन्यांनंतर ही वाढ लागू होईल, असेही डॉ. कल्याणकर यांनी स्पष्ट केले.
१८०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ४२ रहिवाशांच्या झोपड्या हटविणे आवश्यक असून, त्या ठिकाणी १८०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्यात येणार आहे. या कुटुंबांचे स्थलांतर सुलभ होण्यासाठी भाडे साहाय्य, मध्यस्थी शुल्क साहाय्य (ब्रोकरेज) यासह सर्वतोपरी मदत दिली जात आहे. शताब्दीनगरमधील पात्र रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे.